वैजापूर येथे खरीप हंगाम व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीसाठी आढावा बैठक

वैजापूर ,२​​३ मे  / प्रतिनिधी :- खरीप हंगाम पूर्व तयारी व नैसगिर्क आपत्ती व्यवस्थापन मान्सून पूर्व तयारीसह विविध विषयांवर आढावा बैठक आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.23) येथे झाली.

वैजापूर पंचायत समिती सभागृहात आयोजित या बैठकीत पीक स्पर्धेत ज्या शेतकऱ्यांनी शेतात चांगल्या प्रकारे पिकांचे उत्पादन घेतले त्या शेतकऱ्यांचा प्रथमतः सत्कार करण्यात आला. तालुक्यात गोदावरी, शिवना, ढेकू, नारंगी-सारंगी, बोर नदी अश्या छोट्या मोठ्या नद्या असून अतिवृष्टीमुळे नदीजवळील गावांमध्ये मान्सूनच्या कालावधीत सर्तकता बाळगणे आवश्यक आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पाटबंधारे, वनविभाग, महसूल, कृषि विभाग, महावितरण या विभागांनी मान्सूनच्या पूर्वी आपल्या विभागांशी संबंधित कामे पूर्ण करावीत. आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने आराखड्यांचे नियोजन करावे. असे आ. बोरणारे यांनी बैठकीत सांगितले.

नदीकाठच्या ठिकाणी आवश्यकता असेल अशा ठिकाणी शोध आणि बचाव कार्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवावे. पूर परिस्थितीमध्ये स्थलांकरीत करण्यात येणाऱ्या नागरिकांकरीता तात्पुरते निवारा केंद्र उभारणीसाठी संबंधित नगरपरिषद व तहसीलदार यांनी जागा निश्चित करुन सदर ठिकाणी नागरिकांना मुलभूत सोयी उपलब्ध होतील याचे नियोजन करावे. त्याचबरोबर (NDRF) एनडीआरएफ पथकाच्या संपर्कात राहून उदभवलेली  परिस्थिती सावरण्यासाठी एनडीआरएफची पथके ज्या ठिकाणी आवश्यक आहेत त्याठिकाणी पोहोचवता यावी, आवश्यकता भासल्यास खासगी बोटी, बोटी चालक यांची फोन नंबरसह यादी तयार करण्याच्या सूचनाही आ. बोरणारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

महावितरण विभागाने मान्सून काळात विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, ग्रामीण भागातील व शहरातील लाईनच्या कडेला असलेल्या झाडाची छाटणी करावी, नादुरूस्त ट्रान्सफार्मर दुरुस्ती करून घ्यावी तसेच पाटबंधारे विभागाने पाझर तलाव, धरणांची बांधकाम तपासणी करुन धरण दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत अशा सूचनाही संबंधित विभागांना दिल्या. तसेच शेतकऱ्यांचे बँकेत कर्ज प्रकरणे पडून असून शेतकऱ्याला सावकारकी पासून वाचवायचे असेल तर जे गाव त्या बँकेकडे दत्तक आहे त्या बँकेने त्यांना कर्ज द्यावी असे निर्देश बँक मॅनेजर यांना दिले.

सर्व कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांनी समन्वय ठेवणे गरजेचे आहे आपल्या गावात जाण्याचा आठवड्यातून एक दिवस ठरवा. ई-पिक पाहणी 100% नोंदवली जाईल याची देखील खबरदारी घ्या. आतापर्यंत 60 टक्के पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कधीही पिक विमा भरला नसून यावर्षापासून शिंदे-फडणवीस सरकारने एक रुपयांमध्ये पीक विमा ही योजना चालू केली असून एकही शेतकरी यायोजने पासून वंचित राहणार नाही असे आ. बोरणारे म्हणाले.

एखाद्या शेतकऱ्याचा करंट लागून, पाण्यात बुडवून अपघात झाला असेल तर त्याच्या घरच्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत दोन लाख रुपये मदत कशी मिळेल ही देखील जबाबदारी कृषी सहाय्यक यांनी घेतली पाहिजे अशी सूचनाही आ. बोरणारे यांनी केली.

या बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी महक स्वामी, तहसीलदार राहुल गायकवाड, बाजार समितीचे सभापती रामहरी बापू जाधव, माजी सभापती भागिनाथ मगर, गटविकास अधिकारी एच. आर.बोयनर, तालुका कृषी अधिकारी आढाव, जिल्हा परिषद उपकार्यकारी अभियंता वीरगांवकर, पाणी पुरवठा उपकार्यकारी अभियंता कोयलवार, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके, प्रशांत कंगले, रविंद्र कसबे, सरपंच राजूभाऊ छानवाल, हरीभाऊ साळुंके, मल्हारी पठाडे व महावितरण, वनविभाग, जलसंधारण, कृषि विभाग, आरोग्य विभाग, जि प बांधकाम व सार्वजनीक बांधकाम विभाग आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.