समृद्धी महामार्ग दुसरा टप्पा शुक्रवारपासून खुला

नागपूर ते भरवीर आता केवळ पावणे सहा तासांत

नागपूरहून नाशिकला सहा तासांत पोहचा

शिर्डी ते भरवीर अंतर केवळ ४० ते ४५ मिनिटांत पार करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या टप्प्याचे उद्घाटन

नाशिक ,२२ मे  / प्रतिनिधी :- मुंबई ते नागपूर या महत्वकांक्षी समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते नाशिक या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २६ मे रोजी होणार आहे. त्यामुळे शिर्डी ते भरवीर पर्यंतचा मार्ग या दिवसापासून खुला होणार आहे. या मार्गाने आता नागपूरहून नाशिकपर्यंत मार्गक्रमण करता येणार असून हे अंतर वाहनांना सहा तासांत कापता येणार आहे.

शिर्डी ते भरवीर हे अंतर आता ४० ते ४५ मिनिटांत पार करता येणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा ५०१ किमीचा टप्पा सुरू झाला आहे. मुंबई ते भरवीर या उर्वरित २०० किलोमीटरच्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शिर्डी ते भरवीर या टप्प्याचे उद्घाटन १ मे रोजीच करण्यात येणार होते, मात्र मुख्यमंत्र्यांकडून वेळ मिळत नव्हती. आता २६ मे रोजी दुपारी ३ वाजता शिर्डी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचे काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा टप्प्यात १२ बोगदे आणि १६ छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाईल. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाणार असल्याची माहिती आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल.