वैजापूर बाजार समितीवर युतीचा झेंडा ; सभापतीपदी रामहरी जाधव तर उपाध्यक्षपदी शिवकन्या पवार विजयी

वैजापूर ,​२२​ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर  कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) व भाजप युतीचे उमेदवार रामहरी कारभारी जाधव यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी शिवकन्या मधुकर पवार यांची निवड झाली. त्यांनी अकरा मते मिळवून त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनेलचे ज्ञानेश्वर जगताप व प्रशांत सदाफळ यांचा चार मतांनी पराभव केला. या निवडणुकीत विद्यमान आमदार रमेश पाटील बोरणारे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.‌दिनेश परदेशी व आप्पासाहेब पाटील यांच्या पॅनलच्या सर्वच्या सर्व म्हणजे अकरा उमेदवारांनी एकजुट दाखवत बाजार समितीवर युतीचा झेंडा फडकवला.‌ 

सभापती रामहरी कारभारी जाधव

निवडणुक निर्णय अधिकारी विनय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी बारा वाजता विशेष सभा घेण्यात आली. यावेळी सभापतीपदासाठी युतीकडुन रामहरी जाधव व आघाडीतर्फे ज्ञानेश्वर जगताप यांनी अर्ज भरले तर उपसभापती पदासाठी युतीकडुन शिवकन्या पवार व प्रतिस्पर्धी गटाकडुन प्रशांत सदाफळ यांनी अर्ज दाखल केले. सभापती पदाच्या निवडणुकीत रामहरी जाधव यांना अकरा मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ज्ञानेश्वर जगताप यांना सात मते मिळाली.

उपसभापती शिवकन्या पवार

उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवकन्या पवार यांना अकरा तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रशांत सदाफळ यांना सात मते मिळाली. गुप्त मतदान घेतल्यानंतर निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांची घोषणा केली.

यावेळी उपनगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, खुशालसिंह राजपूत, राजेंद्र साळुंके, पारस घाटे, दिनेश राजपूत, मधुकर पवार, वसंत त्रिभुवन, बाळासाहेब जाधव, महेश बुणगे, शैलेश पोंदे, शैलेश चव्हाण, साहेबराव औताडे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव केला. विशेष सभेला कल्याण दांगोडे, संजय निकम, काकासाहेब पाटील, अविनाश गलांडे, अनिता वाणी, रजनिकांत नजन, गणेश इंगळे, प्रवीण पवार, प्रशांत त्रिभुवन, गोरख आहेर, विजय ठोंबरे, शेख रियाज शेख अकिल व बाबासाहेब गायकवाड हे संचालक उपस्थित होते.

सभापती पदासाठी ‘ पंचायत समिती फॉर्म्युला 

पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉग्रेसने सरशी मिळवल्यानंतर माजी आमदार भाऊसाहेब चिकट गांवकर यांनी प्रत्येक वर्षाला नवीन सभापतींची निवड करुन सर्व सदस्यांना खुर्चीचा बहुमान दिला होता. त्याच धर्तीवर बाजार समितीतही आगामी काळात पाच सभापती व पाच उपसभापतींची निवड करुन प्रत्येकाला संधी दिली जाईल. त्यामुळे कुणीही नाराज होऊ नये असे आमदार रमेश बोरणारे व डॉ‌ दिनेश परदेशी यांनी नवनिर्वाचित उमेदवारांचा सत्कार करताना सांगितले. त्यामुळे आज निवड झालेल्या सभापती व उपसभापतींची निवड केवळ एक वर्षासाठी असेल हे स्पष्ट झाले आहे.