सद्गुरू श्री.गंगागिरी महाराज यांचा सप्ताह वैजापूर शहरात घेण्यावरून महाविकास आघाडी व शिंदे गटात चढाओढ

महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्त्यांनी घेतली महंत रामगिरी महाराज यांची भेट

हरिनाम सप्ताह कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष   

वैजापूर ,२१ मे  / प्रतिनिधी :- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सराला बेट येथील सदगुरु श्री.गंगागिरीजी महाराज यांचा १७६ वा  अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी श्रावण पंचमीला म्हणजे 21 ऑगस्ट रोजी प्रारंभ होणार असून त्याची सांगता 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. हा सप्ताह वैजापूर शहरामध्ये व्हावा यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आ. रमेश पाटील बोरणारे व माजी नगराध्यक्ष साबेरखान यांनी मागील महिन्यात श्रीक्षेत्र सराला बेट येथे कार्यकर्त्यांसह जाऊन महंत रामगिरी महाराज यांची भेट घेऊन सप्ताहाचा नारळ मागितला होता. त्यानंतर आज काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील नेते व पदाधिकाऱ्यांनी शहरातील नागरिकांंसह सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांची भेट घेतली व सप्ताहाच्या नारळाचे साकडे घातले. शिंदे गटाचे आ.रमेश बोरणारे व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सप्ताहाचा नारळ स्वतंत्रपणे मागितल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला असून सप्ताहाचा नारळ कुणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, ठाकरे गटाचे नेते माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत सदाफळ, अकिल शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज ठोंबरे, ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख प्रकाश पाटील चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील निकम, ज्ञानेश्वर जगताप, डॉ.‌राजीव डोंगरे आदींनी महाराजांसमोर सप्ताह घेण्याबाबत निवेदन केले.‌

सप्ताहाचे आयोजन करताना कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वांनाच विश्वासात घेऊन हा धार्मिक सोहळा पार पाडण्याची ग्वाही दिली. त्यावर रामगिरीजी महाराजांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अखंड हरिनाम सप्ताह वैजापुरला देण्याचे संकेत दिले आहेत. मात्र याबाबतची जाहीर घोषणा प्रथेप्रमाणे पुणतांबा (जि. अहमदनगर) येथे महाराज करणार आहेत. तथापि, महाराजांकडून सप्ताहाची तयारी करण्यासाठी हिरवा कंदिल मिळाल्याने भक्तगणांत आनंदाचे वातावरण असून लवकरच सप्ताहासाठी विस्तृत जागेची पाहणी करण्यात येईल अशी सर्वांना अपेक्षा आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले. यावेळी मधुकर महाराज, ॲड. प्रमोद जगताप, ॲड.आर.डी.थोट, साईनाथ मतसागर, प्रकाश चव्हाण, प्रकाश बोथरा, शोभाचंद संचेती, काशिनाथ गायकवाड, अंजलीताई जोशी, बापू सोनवणे, भिमाशंकर साखरे, मनाजी मिसाळ यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. 

सप्ताह घेण्यावरून राजकारण सुरू झाल्याने हा चर्चेचा विषय बनला असून सदगुरू गंगागिरीजी महाराज यांच्या १७६ व्या सप्ताहाचा नारळ आ. बोरणारे यांना मिळतो की महाविकास आघाडीच्या नेत्यांना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.