सोन्याची बांगडी चोरणाऱ्या महिलेस अटक 

छत्रपती संभाजीनगर ,२१ मे  / प्रतिनिधी :- सोने खरेदी करण्‍याच्‍या बहाण्‍याने ज्वेलर्सच्‍या दुकानात शिरलेल्या बुरखाधारी महिलेने दुकानातील सेल्समनची नजर चुकून ९७ हजार रुपये किंमतीची १७.४२० ग्रॅम वजनाची सोन्‍याची बांगडी चोरली. हा प्रकार ११ एप्रिल रोजी उस्‍मानपुरा परिसरातील जडगांववाला ज्वेलर्स येथे घडला.या प्रकरणात पोलिसांनी तपास करुन ब्युटी पार्लर चालविणाऱ्या  शबाना सय्यद इम्रान (३६, रा. बायजीपुरा) हिला शनिवारी दि.२० सायंकाळी साडेपाच वाजेच्‍या सुमारास अटक केली. तिला सोमवारपर्यंत दि.२२ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.व्‍ही. चरडे यांनी रविवारी दि.२१ दिले.

या प्रकरणात महाविर प्रभाकर गोमटे (३५, रा. विष्‍णुनगर) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादी हे जडगांववाला ज्वेलर्सच्‍या दुकानात सेल्समन म्हणुन काम करतात. ११ एप्रिल रोजी एक बुरखाधारी महिला दागिने खरेदी करण्‍याचा बहाणा करुन दुकानात शिरली. तिने फिर्यादीला वेगवेगळ्या सोन्‍याच्‍या बांगड्या दाखविण्‍यास सांगितले. त्‍यानूसार फिर्यादी बांगड्या दा‍खवित होते, त्‍याचवेळी एका बांगडीचे जोड आवडली म्हणून त्‍याची किंमत आरोपी महिलेने विचारली, फिर्यादीचे कॅल्‍क्यूलेटने बांगडीची किंमत काढत असतांना आरोपी महिलेने बांगड्यांपैकी एक बांगडी पर्स मध्‍ये टाकली, व पतीसोबत नंतर येते असे सांगून तेथून निघून गेली. नेहमी दुाकनातील कामकाज झाल्यानंतर रात्री सर्व दागिने मोजत असतांना एक दागिना गहान झाल्याचे लक्षात आले. तेंव्‍हा दुकानातील सीसीटीव्‍ही तपासले असता, बुरखाधारी महिलेने बांगडी चोरल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात उस्‍मानपुरा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपी महिलेला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी आरोपी महिलेकडून चोरलेली सोन्‍याची बांगडी हस्‍तगत करायची आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, आरोपीने अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले याचा तपास करायचा असल्याने पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.