कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या;डी. के. शिवकुमार बनले उपमुख्यमंत्री

शपथविधी समारंभाल लाखभर लोकांची व ज्येष्ठ राजकीय नेत्यांची उपस्थिती

बंगळुरू,२० मे/प्रतिनिधीः- कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची सिद्धरामय्या यांनी शनिवारी शपथ घेतली. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उप मुख्यमंत्रीपद स्वीकारले.

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी वरील दोघांना पद आणि गोपनीयतेची शपथ येथील कांतिरावा स्टेडीयमवरील समारंभात दिली. सिद्धरामय्या हे वर्ष २०१३ आणि २०१८ या दरम्यान मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्याचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून देवाचे नाव घेत शपथ घेतली तर शिवकुमार यांनी त्यांचे अध्यात्मिक गुरू गंगाधर अज्जा यांचे नाव घेऊन. जी. परमेश्वर यांनी पदाची शपथ घटनेचे नाव घेऊन तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. एच. मुनियाप्पा आणि के. जे. जॉर्ज यांनी देवाचे नाव घेऊन शपथ घेतली.

या शपथविधी समारंभाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी, पक्षाच्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती, बिहारचे उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदी महत्वाचे लोक उपस्थित होते.

तामिळनाडू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार कमल हासन, कन्नडचे सुपरस्टार शिवराज कुमार, अभिनेते दुनिया विजय, अभिनेत्री व राजकीय नेता रम्या, अभिनेत्री निश्विका नायडू, वरिष्ठ अभिनेत्री व राजकीय नेता उमाश्री आणि चित्रपट दिग्दर्शक व निर्माते व्ही. राजेंद्र सिंह बाबू यावेळी उपस्थित होते. शपथविधी ठिकाणी सिद्धरामय्या आणि शिवकुमार हात हातात घालून आले व त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले.

नंतर राहुल गांधी आल्यावर उपस्थित जमावाने त्यांचे स्वागत केले. शपथविधी समारंभाला जवळपास एक लाख लोक उपस्थित होते. शपथविधी समारंभापूर्वी राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले होते की, “कर्नाटकमधील जनतेत पुन्हा येणे ही खूप मोठी घटना आहे. नव्या काँग्रेस सरकारच्या शपथविधी समारंभाची वाट पाहतोय. हे सरकार जनतेचा विचार करणारे आणि विकास आणणारे असेल.”