तुळजाभवानी मंदिर संस्थानने ड्रेसकोडचा निर्णय बदलला

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना असभ्य कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली होती. आता हा निर्णय मंदिर प्रशासनाने मागे घेतला आहे. याबाबत तहसीलदारांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांनच्यावतीने एक नियमावली जारी करण्यात आली होती. त्या नियमावलीचे फलक हे मंदिर परिसरात लावण्यात आले होते. बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळणार नाही असे सांगण्यात आले होते.

ड्रेसकोडबाबतच्या नियमांची पूर्वकल्पना भाविकांना देण्यात आली नव्हती. अचानकपणे लागू करण्यात आलेल्या नियमांचा मोठा फटका भाविकांना बसला आहे. एका १० वर्षीय मुलालादेखील सुरक्षा रक्षकांनी दर्शन घेण्यापासून अडवले होते. या कारणामुळे भाविकांमध्ये असलेली नाराजी, रोष बघता तुळजाभवानी मंदिर संस्थानने भाविकांच्या ड्रेस कोडवरून माघार घेतली आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे तहसीलदार यांनी एक निवेदन काढले आहे. तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.