वैजापूर तहसील कार्यालयांच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज भूमीपूजन

नवीन इमारतीसाठी आठ कोटी 94 लाख रुपयांचा निधी मंजूर ; कार्यक्रमाला चार मंत्र्यांची उपस्थिती राहणार 

वैजापूर ,१९ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर येथे आठ कोटी 94 लाख रुपये खर्चुन बांधण्यात येणाऱ्या तहसिल कार्यालयाच्या नविन प्रशासकीय इमारतीच्या भुमीपुजनासाठी शनिवारी (ता.20) चार कॅबिनेट मंत्री वैजापूर शहरात येणार आहेत. सकाळी साडेदहा वाजेला आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भुमीपुजनाचा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची उपस्थिती असणार आहे. याशिवाय या कार्यक्रमाला कृषि मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, वैजापुरचे आमदार रमेश पाटील बोरणारे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य एकनाथ जाधव, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप,  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे आप्पासाहेब पाटील आदी मान्यवरही हजर राहणार आहेत. जुन्या तहसिल कार्यालयाच्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही इमारत बांधण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रशासनासह शिवसेना- भाजपने केले आहे.