तुळजा भवानी मंदीर प्रशासनाचा मोठा निर्णय, वाद होण्याची शक्यता

तुळजापूर, ​१८​ मे  / प्रतिनिधी :-महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजा भवानी देवीच्या मंदीर प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता मंदीरात तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदीर प्रशासनाकडून याबाबतचे फलक लावण्यात आले आहे. संस्थानाने घेतलेल्या या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. देश-विदेशातून भाविकांनी मंदीर प्रशासनाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काहींनी कडाडून विरोध दर्शवला आहे.

तुळजा भवानी मंदीर प्रशासनाकडून ठिकठिकाणी याबाबतचे फलक लावण्यात आले आहेत. त्यात अंगप्रदर्शन करणारे, उत्तेजीत करणारे, तसेच असभ्य व अशोभनिय वस्त्र परिधाण केलेले तसेच बर्मुडा आणि हाफ पँट घातलेल्यांना मंदीरात प्रवेश दिला जाणार नाही. असा मजकूर या फलकांवर लिहण्यात आला आहे. तसेच या फलकांद्वारे भारतीय संकृती आणि सभ्यतेचे भान ठेवण्याची विनंती भाविकांना करण्यात आली आहे.

दरम्यान, 2018 च्या ऑक्टोंबर महिन्यात नवरात्री उत्सवात कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदीर प्रशासनाने असाच निर्णय घेतला होता. तसेच शिर्डीत देखील तोकड्या कपड्यांवर प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र, भाविकांनी केलेल्या तिव्र विरोधामुळे ते निर्णय मागे घेण्यात आले होते. आता आई तुळजा भवानी मंदीर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मंदीराच्या महाद्वारापासून ते गाभाऱ्यापर्यंत हे फलक लावण्यात आले आहेत.