रोटेगाव रेल्वे स्थानकाची विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांच्याकडून पाहणी

प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मागण्यांचे निवेदन

वैजापूर ,१८ मे  / प्रतिनिधी :-दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक निती सरकार यांनी गुरुवारी (ता.18) रोटेगांव रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रामचंद्र पिल्दे यांनी त्यांना रोटेगांव रेल्वे स्थानकावर जनशताब्दी, सचखंड व पुणे एक्सप्रेसला थांबा द्यावा यासह इतर मागण्यांचे निवेदन दिले.

दोन तासांच्या दौऱ्यात निती सरकार यांनी रेल्वेस्थानकातील प्रतिक्षागृह,रेल्वे पटरी, ट्रॅक्शन सबस्टेशनमधील विद्युतीकरण व परिसराची पाहणी केली. यावेळी सरकार यांच्याहस्ते ट्रॅक्शन सबस्टेशन  येथे वृक्षारोपणही करण्यात आले. स्टेशन अधीक्षक बी.जी. वाघ यांनी त्यांचे स्वागत केले.

रोटेगांव रेल्वेस्थानकावर जनशताब्दी एक्स्प्रेस, पुणे एक्सप्रेस व सचखंड एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा द्यावा, रेल्वेस्थानकात बोगी कोण डिस्प्ले व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, नवीन सार्वजनिक स्वछतालय सुरू करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे रामचंद्र पिल्दे यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक निती सरकार यांना दिले.

यावेळी नगरसेवक गणेश खैरे, राजेंद्र तोष्णीवाल  भाजपचे गौरव दोडे यांनीही सरकार यांची भेट घेऊन रेल्वेबाबतच्या विविध मागण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.