नांदूर मध्यमेश्वर कालव्यात ट्रॅक्टर कोसळला ; दोन भाऊ पाण्यात पडले, एक बेपत्ता

वैजापूर ,१८ मे  / प्रतिनिधी :-वळण घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर अचानक वाहत्या कालव्यात कोसळला. त्यामुळे दोन चुलत भाऊ पाण्यात पडले. मात्र यातील एक जण प्रवाहासोबत वाहुन गेला तर दुसऱ्याने आधार शोधल्याने त्यांचा जीव वाचला. ही दुर्घटना गुरुवारी (ता. १८) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील शिरसगाव शिवारात महालगाव – शिरसगाव रस्त्यावर घडली.‌ 

या घटनेत मोहन छबु धात्रक (वय ३५, रा.शिरसगाव) हा तरुण पाण्यात कऊटगावच्या दिशेने वाहून गेला असून घटनेनंतर सात तासानंतरही त्याचा शोध लागला नव्हता. विरगाव पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल व्ही.एम.बामंदे, जी.आर.थोरात व पोलिस पाटील महेश निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या मदतीने शोध कार्य सुरु केले. या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, मोहन धात्रक व त्यांचा चुलत भाऊ गणेश धात्रक हे दोघे गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरने महालगावकडून शिरसगावच्या दिशेने जात होते.‌ या रस्त्याने जात असतांना पुलाजवळ वळण घेतल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले व हा ट्रॅक्टर कालव्यात कोसळला. सध्या पाटबंधारे विभागाने जलदगती कालव्यातुन पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडले आहे. त्यामुळे कालव्यातूनल वेगाने पाण्याचा प्रवाह सुरु आहे.‌ दोघेही पाण्यात पडल्यानंतर गणेश धात्रक याने लगेचच लोखंडी ॲंगलचा आधार घेतल्याने त्याचा जीव वाचला तर मोहन धात्रक हा प्रवाहाबरोबर वाहुन गेला. पोलिसांनी त्यांचे शोध कार्य सुरु केले आहे. या घटनेमुळे शिरसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.