युवकांनी आवडीप्रमाणे शिक्षण, प्रशिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा – मंत्री अतुल सावे

राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या माध्यमातून शासन तरुणांना कौशल्याधारित शिक्षण

छत्रपती संभाजीनगर ,१३ मे  / प्रतिनिधी :-राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या माध्यमातून शासन तरुणांना कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. युवकांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण, प्रशिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारमंत्री अतुल सावे यांनी आज केले.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज पुंडलिक नगर, तिरुमला मंगल कार्यालयात  राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन  मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी उपसंचालक गणेश दंदे,  प्रादेशिक कार्यालयाचे सतिश सुर्यवंशी,  औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभिजित आल्टे, कर्नल सतिश ढगे, प्रायार्य डी. एम. पाटील, मार्गदर्शक अनिल जाधव, ॲड राहूल नांवदर याच्यांसह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची  उपस्थिती होती.

युवकांना प्रशिक्षणातून सक्षम बनवण्यासाठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले आहेत. हे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहे. या सर्व सुविधांचा लाभ घेऊन करिअर करावे. स्पधेच्या युगात बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करुन यशस्वी व्हावे. त्याप्रमाणे आत्मनिर्भर होण्यासाठी यासर्व सुविधासह मार्गदर्शन शिबिराचाही लाभ घ्यावा. नव मतदारांने आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन श्री. सावे यांनी केले

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावित्यता विभाग अनुसूचित जाती व नवबौद्धाच्या मुलामुलींना शासकीय उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामार्फत आयोजित 10 वी 12 वी उत्तीर्ण मुला मुलींसाठी छात्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमांत लेफ्टनंट कर्नल सतिश ढगे  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करताना म्हणाले की, स्वत:मधील क्षमता ओळखून करिअर करावे. अभ्यासात सातत्य , मेहनत याबरोबरच शिबिराच्या माध्यमातून मिळणारे मार्गदर्शन घ्यावे. आपल्या क्षमता विकासासाठी योग्य मार्गदर्शन मिळणे खूप महत्त्वाचे असते. ते मार्गदर्शन मिळण्याची संधी या शिबिरातून मिळत असल्याचेही ते म्हणाले.