वैजापूर औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन:वाढीव मोबदल्यासाठी पाठपुरावा करणार – आमदार रमेश बोरणारे यांचे आश्वासन

वाढीव मोबदल्यासाठी पाठपुरावा करणार – आमदार रमेश बोरणारे यांचे आश्वासन

वैजापूर ,१२ मे  / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यात औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा लाभधारक शेतक-यांना माफक वाढीव मोबदला रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार रमेश बोरनारे यांनी दिली. औद्योगिक वसाहतीसाठी लोणीबुद्रुक येथील  संपादित क्षेत्रातील लाभधारक शेतकरी व औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक आ. रमेश बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.12) सकाळी त्यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली.

या बैठकीला औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, भुमि अभिलेख कार्यालयाचे जिल्हा निरीक्षक रविंद्र नाराळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र सांळुके, उपतालुकाप्रमुख प्रकाश मतसागर, बाजार समितीचे संचालक गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन, स्वीय सहाय्यक रामदास वाघ, प्रदीप सांळुके, अमोल बोरनारे आदीसह लाभधारक शेतकरी मोठयासंख्येने उपस्थित होते. वैजापूर औद्योगिक वसाहत निर्मिती साठी रोटेगाव, आघूर, लोणीबुद्रुक, जरुळ या चार गावातील 436 हेक्टर जमीन क्षेत्र औद्योगिक विकास महामंडळाने 1997 या वर्षात संपादित केलेले आहे. संपादित जमीन क्षेत्राचा वाढीव दराने मोबदला मिळावा यासाठी बहुतांश लाभधारक शेतक-यांनी न्यायालयात दाद मागितल्यामुळे औद्योगिक वसाहत कार्यान्वित करण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आमदार बोरणारे यांनी पुढाकार घेऊन औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व शेतकरी यांच्यात समन्वय घडवुन आणला. लाभधारक शेतक-यांना संपादित क्षेत्राचा वाढीव मोबदला तसेच आरक्षित भूखंड मिळवून देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व शेतक-यांत त्यांनी सकारात्मक चर्चा झाली. औद्योगिक वसाहती करिता संपादित केलेल्या चार गावांपैकी पहिल्या टप्प्यात लोणीबुद्रुक गावातील शेतक-यांशी चर्चा केली. या बैठकीत उपस्थित शेतक-यांनी आम्हाला औद्योगिक विकास महामंडळाकडून अपेक्षित वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी आमदार रमेश बोरणारे यांनी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.आमदार बोरणारे यांनी औद्योगिक विकास महामंडळातील अधिका-यांना बैठकीत शेतक-यांनी व्यक्त केलेल्या वाढीव मोबदला व त्यांना नियमानुसार मिळणा-या आरक्षित भूखंडाचा अहवाल जलदगतीने वरिष्ठ अधिका-यांना सादर करण्याच्या सूचना दिल्या.

लाभधारक शेतक-यांना वा-यावर सोडणार नाही..      आमदार बोरणारे
वैजापूर तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देताना ज्या शेतक-यांनी या प्रकल्पाकरिता जमीन क्षेत्र दिले आहे. त्यांना नियमानुसार त्यांना वाढीव मावेजा रक्कम मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करु असे आमदार बोरणारे यांनी सांगितले.