शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार – संजय राऊत यांचे भाकित

मुंबई,  १२ मे/प्रतिनिधीः महाराष्ट्रातील सरकार हे घटनाबाह्य असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेश किंवा निदेशांचे पालन नोकरशाही आणि पोलिसांनी करू नये, असे आवाहन शिवसेनेचे (उबाठा) मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी येथे केले.

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निवाड्यात राज्य सरकार हे घटनाबाह्य आणि बेकायदा असल्याचे म्हटल्याचे राऊत म्हणाले.
“सर्वोच्च न्यायालयाचा निकाल याबाबतीत अगदी स्पष्ट आहे. हे बेकायदा सरकार तीन महिन्यांत जाणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेवर सभापतींच्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने निवाड्यात हे संपूर्ण सरकार घटनाबाह्य असल्याचे घोषित केले आहे आणि एवढेच काय राहिलेले २४ आमदारही अपात्र होतील,” असे राऊत म्हणाले.
शिंदे-फडणवीस हे दोघे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यावर चुकीची आणि अर्धसत्य माहिती पसरवत असल्याचा आरोप राऊत यांनी करून म्हटले की, हे दोघे त्याला त्यांचा विजय झाल्याचा दावा करीत आहेत. राज्य सरकारला निवाड्यामुळे दिलासा मिळाल्याचे सांगणाऱ्या प्रसारमाध्यमांतील काही जणांवर त्यांनी टीका केली. दिलासा मिळाल्याचे सांगणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा जवळजवळ अवमान केल्यासारखेच आहे, असे ते म्हणाले.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारचे सगळे निर्णय, आदेश इत्यादी बेकायदा ठरतात. या घटनाबाह्य सरकारच्या कोणत्याच आदेशांचे पालन करू नका, असे माझे अधिकाऱ्यांना आवाहन आहे. कारण त्याचे परिणाम नंतर त्यांनाच भोगावे लागू शकतील, असा इशाराही राऊत यांनी दिला. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. हा निर्णय होईपर्यंत या सरकारने कोणतेही निर्णय घेण्याचा, आदेश देण्याचा नैतिक अधिकार गमावला असून शिंदे-फडणवीस सरकारच्या कोणत्याच आदेशाचे पालन नोकरशाही आणि पोलिसांनी करूच नये. आदेशाचे पालन झाल्यास अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे राऊत म्हणाले.

पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मूळ शिवसेना आणि आता भाजप असा प्रवास केलेले नार्वेकर यांचे वर्णन संजय राऊत यांनी विचारांशी एकनिष्ठता नसलेले आणि फक्त सत्तेची इच्छा असलेला असा माणूस या शब्दांत केले. सर्वोच्च न्यायालयाने सभापतींना १६ आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णय हा ठराविक वेळेत घेण्याचा आदेश ११ मेच्या निवाड्यात दिला आहे. संजय राऊत यांनी हे बेकायदा आणि घटनाबाह्य शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार असल्याचा पुनरुच्चार केला.