वैजापुरात चहाचे बिलावरून वाद होऊन झालेल्या मारहाण प्रकरणात चौघांविरुद्ध अँट्रॉसिटीचा गुन्हा

वैजापूर ,१२ मे  / प्रतिनिधी :-चहाचे बिल देण्याच्या कारणावरुन ८ मे रोजी शहरातील गजबजलेल्या आंबेडकर चौकात दोन गटात झालेल्या हाणामारीत  ​१४​ वर्षाचा मुलगा जखमी झाला. त्याने तक्रार दिल्यानंतर विरोधी गटातील हॉटेल मालकासह चार जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला असुन या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी या करीत आहेत.

आंबेडकर चौकातील सहारा हॉटेलचे बिल देण्यावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. या घटनेत दत्तवाडी भागात राहणारा कृष्णा रवि सोनवणे हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.‌ याप्रकरणी त्याने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सहारा हॉटेलजवळ दोन गटात हाणामारी झाली त्यावेळी तौफिक शाह साबेर शाह व तालेफ शाह जमील शाह या दोघांनी काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच सोहेल आसेफ अली सय्यद व सहारा हॉटेलचा मालक इसाक कुरेशी यांनी शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक अधीक्षक स्वामी यांच्यासह पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, एपीआय नरवडे, पोलिस उपनिरीक्षक राजपूत, रज्जाक शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात पोलिसांनी एकास अटक केली आहे.