नैतिकता असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – उद्धव ठाकरे
मुंबई, ११ मे / प्रतिनिधी :-न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आपला निर्णय दिल्यानंतर राज्यात आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत कोर्टाच्या निर्णयावर आपली भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
कायद्यानुसार माझा राजीनामा अवैध असू शकतो. पण नीतीमत्तेचा प्रश्न येतो, या मुख्यमंत्र्यांमध्ये नैतिकता असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मी राजीनामा दिला नसता तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. पण मी स्वतःसाठी लढत नाही. आम्हाला हा देश वाचवायचा आहे.
मी एका गोष्टीवर समाधानी आहे. हा निर्णय शिवसेनेचा नसून लोकशाहीचा आहे, असे मी म्हणत होतो. न्यायालयाने आज दिलेल्या निकालात सत्तेसाठी भुकेल्या लोकांचे उघड राजकारण उद्ध्वस्त झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यपालांची भूमिका अयोग्य होती. राज्यपालांची भूमिकाही काढून घेण्यात आली आहे. राज्यपाल व्यवस्था ही आजवर आदरणीय व्यवस्था होती. पण राज्यपाल ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत, ते पाहिल्यानंतर राज्यपाल यंत्रणा अस्तित्वात असावी की नसावी, हा मोठा विचार सर्वोच्च न्यायालयासमोर व्हायला हवा. राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकार नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत दिला आहे असेही ठाकरे म्हणाले.
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव पहिल्यांदाच मातोश्रीवर आले. लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष आणि जनतेला एकत्र करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला बळ देण्यासाठी हे दोघे आले आहेत.
म्हणून मी राजीनामा दिला
जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार कदाचित परत आले असते असं सुप्रीम कोर्टानं आजचा निर्णय देताना म्हटलं होतं. यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कायदेशीरदृष्ट्या राजीनामा दिला ही चूक असू शकते, पण नैतिकता बघितली तर ज्या पक्षाने आणि माझ्या वडिलांनी ज्यांना सगळं दिलं त्यांच्यासाठी मी विश्वास आणि अविश्वास का दाखवू? असा सवाल करतानाच मी राजीनामा दिला नसता तर मी पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो, पण माझ्यासाठी ही लढत नाहीये. माझी लढाई राज्यासाठी आणि देशासाठी आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्यापालांवर निशाणा
दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन राज्यपालांवर देखील निशाणा साधला आहे. राज्यपालांची भूमिका संशयास्पद म्हणण्याची गरज नसून ती अयोग्य ठरली आहे. राज्यपाल ही यंत्रणा आदरयुक्त होती, पण शासनकर्त्यांनी धिंडवडे काढले आहेत, ते पाहिल्यानंतर राज्यपाल यंत्रणा अस्तित्वात ठेवावी की नाही, याचा विचार केला पाहिजे.