राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

मुंबई, ११ मे  / प्रतिनिधी :-राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. जयंत पाटील यांना आयएल  आणि एफएस  प्रकरणांमध्ये नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आज सर्वोच्च न्यायालय सत्तासंघर्षाचा निकाल देणार आहे. अशात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीच्या नोटीस मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज येणार असून जयंत पाटील यांना नोटीस मिळण्याच्या काही तास आधी हा योगायोग आहे की काय, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

ईडी आयएल आणि एफएस कंपन्यांच्या व्यवहाराची चौकशी करत होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. यापूर्वीही या कंपनीप्रकरणी राज ठाकरेंना नोटीसही पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. मनी लाँड्रिंग झाली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अरुणकुमार साहा याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. यामध्ये अनेकांची नावे पुढे आली. त्यात जयंत पाटील यांच्या नावाचाही समावेश आहे.