छत्रपती संभाजीनगर जिल्हा खरीप नियोजनाचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

खते, बियाणे उपलब्धतेसाठी काटेकोर नियोजन करावे –      पालकमंत्री संदिपान भूमरे

छत्रपती संभाजीनगर ,११ मे  / प्रतिनिधी :-आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करा, तसेच कोणत्याही परिस्थितीत खते, बियाणे यांची टंचाई भासणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी दिले.

      जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. बैठकीला अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरीभाऊ बागडे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक ( ग्रामीण ) मनीष कलवानिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी.आर. देशमुख आदी उपस्थित होते.

      पालकमंत्री श्री. भूमरे म्हणाले, खरीप हंगामामध्ये बियाणे आणि खतांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर जाणवतो. त्यामुळे या दोन्हीचे नियोजन आवश्यक आहे. पिक पेरणी क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाचे नियोजन महत्वाचे ठरणार आहे. गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करुन तातडीने शासनास अहवाल सादर करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

       खरीप पीक हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. पीक कर्जाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पुण करा तसेच शेतीपंपासाठी आवश्यक त्या प्रमाणात वीजपुरवठा होईल यादृष्टीने विद्युत विभागाने नियोजन शेतकऱ्यांचा पिक विम्याची समस्या जाणवते. करा. पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री श्री. भूमरे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी खते, बियाणे व इतर निविष्ठांबाबत नियोजन करण्यासोबतच, शेतकरी बांधवांना वेळेत बियाणे उपलब्ध असावे यासाठी परिपूर्ण नियोजन व कार्यवाही व्हावी, असे निर्देश दिले तसेच तहसील कार्यालयात असलेल्या डिजीटल बोर्डवर कृषी विभागाने त्यांचे साप्ताहिक नियोजन, विविध योजना तसेच शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा संदेश द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनीही जिल्हा परिषदेचे कृषि विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मान्सूनपुर्व तयारी व पाणीटंचाई बाबतही आढावा

जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपुर्व तयारीबाबतही आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील नदीकाठी वसलेल्या एकुण 62 गावांमध्ये मान्सुन पूर्व प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम राबविला असून जवळपास 2 हजार 687 गावकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या महिन्याच्या अखेरीस 165 आपत्ती प्रवण गावांमध्ये साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच मान्सूनपुर्व तयारीबाबतही सादरीकरणाव्दारे जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी दिली. तसेच पाणीटंचाई व जलजीवन मिशन या योजनांचाही आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर खरिप व रब्बी हंगामातील विविध पिकांच्या पीक स्पर्धेत अतीउच्च पीक उत्पादकता काढून प्रथम क्रमांक मिळविलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जलसंधारण विभागाच्या चित्ररथाचेही तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या गावपातळीवर तलाठी व कृषी सहायक यांच्यासाठीच्या लोखंडी कटेनर कार्यालयाचेही उदघाटन पालकमंत्री श्री. भूमरे यांच्या हस्ते करण्यात आले.