वैजापूर – गंगापूर चौफुलीवर कारची टेम्पोला धडक :डिझेल टाकी फुटून टेम्पोला आग ; सात जण गंभीर जखमी
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे कंदुरीच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या दहा जणांच्या टेम्पोला भरधाव कारने जोराची धडक दिल्याने टेम्पो उलटुन सात जण गंभीर जखमी झाले. तर टेम्पोची डिझेल टाकी फुटुन आग लागली. स्थानिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने टेम्पोत अडकलेल्यांना बाहेर काढले. येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी रात्री बारा वाजल्याच्या सुमारास वैजापूर – गंगापूर चौफुलीवर घडला.

जालना जिल्ह्यातील वंजारवाडी तांडा येथील बंजारा समाजाचे लोक सिन्नर येथे कंदुरीच्या कार्यक्रमासाठी पवन आडे यांच्या टेम्पोने (एमएच ०२ वाय एफ ५७७२) नाशिककडे जात होते. गंगापूर चौफुली जवळ आल्यानंतर गंगापुरच्या दिशेने जाणाऱ्या कारने (एमएच ०४ एफआर ९२६२) त्यांना जोराची धडक दिली. त्यामुळे टेम्पो उलटला व टेम्पोतील पुजा राठोड (२७), शिला राठोड (४८), दिवाण राठोड (५०), जितेंद्र राठोड (२९), अविनाश राठोड, मोहन राठोड (५२), पार्वतीबाई राठोड (४८) हे गंभीर जखमी झाले.
वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अग्निशामन दलाला पाचारण केले व आग विझवण्यात आली. याप्रकरणी वंजारवाडी तांडा येथील कैलास जाधव यांनी कारचालकाच्या विरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.घटनेचे वृत्त कळताच आ.रमेश पाटील बोरणारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व अपघाताची माहिती घेऊन विचारपूस केली.