औसा येथील सामुदायिक विवाह सोहळ्याचा आदर्श लोकप्रतिनिधींनी घ्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह

• आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून आयोजन

लातूर,१० मे  / प्रतिनिधी :- आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून एक आदर्श विवाह सोहळा आज औसा येथे होत आहे. आपल्या मुलाच्या विवाहाबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ जोडप्यांचा विवाह अत्यंत भव्यदिव्य करून आदर्श निर्माण केला आहे. इतर लोकप्रतिनिधींनी आ. पवार यांचा आदर्श घेतल्यास सर्वसामान्य कुटुंबातील विवाह सोहळे दिमाखात होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच आमदार अभिमन्यू पवार आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनचे कौतुक करून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून क्रिएटिव्ह फाउंडेशनने औसा येथील उटगे मैदानावर आयोजित केलेल्या औसा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, कष्टकरी व आर्थिक दुर्बल कुटुंबातील २५ जोडप्यांच्या या सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. आ. अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव अ‍ॅड. परिक्षीत व डॉ. उदय मोहिते पाटील यांची कन्या डॉ. चैताली यांचा विवाह याच सामुदायिक विवाह सोहळ्यात पार पडला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खनिकर्म व बंदरे विभागाचे मंत्री दादा भुसे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री, लोकसभा सदस्य, विधानसभा व विधानपरिषद सदस्य, गहिनीनाथ महाराज औसेकर यावेळी उपस्थित होते.

आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न दिमाखात व्हावे, हे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या मुलाच्या विवाहाबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील, कष्टकरी कुटुंबातील 25 जोडप्यांचा भव्यदिव्य विवाह सोहळा घडवून आणून हे स्वप्न साकार केले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

आपल्या मुलाला जे कपडे तेच कपडे सामुदायिक विवाह सोहळ्यातील २५ वरांना, यासह सर्व गोष्टी सारख्या करून आमदारअभिमन्यू पवार यांनी अत्यंत चांगला पायंडा पाडल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आपले कुटुंब समजून आ. पवार यांनी २५ मुलींचे कन्यादान केले. आहेर केले, संसार उपयोगी वस्तू दिल्या. आपल्या आनंदात इतरांचा आनंद बघणारे आ. पवार म्हणूनच वेगळे आहेत. हा लग्नसोहळा अत्यंत सुनियोजित, दिमाखदार होत असून हा या २५ कुटुंबांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही यावेळी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. लातूर जिल्ह्याच्यावतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सर्वांचे स्वागत करून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. आमदार अभिमन्यू पवार यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यामागील संकल्पना सांगताना, हा सर्व विवाह सोहळा घडवून आणण्यात कार्यकर्ते, स्नेही यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.