शरद पवारांचा शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा

देवेंद्र फडणवीस कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला गेले ही बाब चांगली नाही

 सोलापूर ,७ मे  / प्रतिनिधी :-​ ​शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. शरद पवार यांनी राजीनामा मागे घेऊ नये यासाठी पक्षातील अनेक जण देव पाण्यात घालून बसले होते, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी राजीनामा परत घेऊ नये म्हणून भाजपवाल्यांनी देव पाण्यात ठेवले होते असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेला अजित पवार अनुपस्थित होते. त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. अखेर यावर देखील शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मीच अजित पवार यांना पत्रकार परिषदेत न येण्यास सांगितलं होतं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मी त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. मात्र अजूनही मदत मिळालेली नाहीये. राज्यात लोकांना बदल हवा आहे. विरोधकांची एकजूट व्हावी हीच आमची इच्छा असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विविध विषयांवर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

काय म्हणाले शरद पवार ?

कर्नाटकात देखील काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे समजते. देशात अनेक राज्यांमध्ये बिगर भाजप पक्षाचे सरकार असल्याची स्थिती आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काय होईल हे सध्या सांगता येणार नाही.

बारसू रिफायनरीबाबतही यावेळी भूमिका स्पष्ट केली. राज्याच्या विकासाच्या कोणत्याही प्रकल्पाचे स्वागतच आहे. मात्र, स्थानिकांना विचारात घेऊन असे प्रकल्प उभे राहावेत. तेथील शेती, मासेमारी या व्यवसायांचे नुकसान होता कामा नये. सरकारने पोलीस बळाचा वापर करण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढावा असे मला वाटते. पर्यावरणासाठी घातक असे प्रकल्प असतील तर तसे प्रकल्प होऊ नयेत.

गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मी त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. त्यांनी पंचनामे करून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात येईल असे सांगितले. काही ठिकाणी काम सुरू झाले आहे. मात्र आम्ही आढावा घेतला तर अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.

देवेंद्र फडणवीस कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला गेले ही बाब चांगली नाही. सीमाभागातील लोकांनी खूप सोसलं आहे. त्यांना जर समजले की महाराष्ट्र त्यांच्या बाजूने नाही तर त्याला अतीव दुःख होईल.

लोकसभेची निवडणूक लवकर होणार असेल तर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील लोकांनी एकत्रित बसून कामाला लागण्याची गरज आहे. मुंबईला परत गेल्यावर आम्ही एकत्रित आखणी करून कामा लागू. मी जो महाराष्ट्र बघतोय त्यानुसार जाणवते की लोकांना बदल करण्याची इच्छा आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता राज्यात असो वा देशात तेथे बदल झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. विरोधकांची एकजूट व्हावी अशी आम्हां सर्वांची इच्छा आहे. बिहारचे मुख्यमंत्री १८ तारखेला मुंबईत येत आहेत. त्यांच्यासोबत माझी बैठक आहे. त्यावेळी एका विचाराने कसे पुढे जाता येईल व निवडणुकीद्वारे या देशात बदल कसे करता येतील याविषयी चर्चा होईल. या प्रयत्नाला माझे पूर्ण सहकार्य राहील.