राजीनामास्त्रानंतर पवार पहिल्यांदाच विठ्ठलाच्या चरणी

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आहे. शरद पवारांसोबत यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटीलही होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या राजीनामा नाट्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच दौऱ्यासाठी बाहेर पडले होते. शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं.

शरद पवारांनी लोक माझे सांगाती या त्यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनावेळी राजीनाम्याची घोषणा करत धक्का दिला. पवारांच्या या निर्णयामुळे नेते आणि कार्यकर्ते भावुक झाले. एवढच नाही तर कार्यकर्त्यांनी आंदोलन आणि उपोषणही केलं. नेते आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला.

विठ्ठलाच्या दर्शनाला येतो पण…

काही वर्षांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात शरद पवार यांनी आपण वारी केली नाही, पण त्याचा अनादरही केला नसल्याचं विधान केलं होतं. कधी पंढरपूरला गेलो तर जास्त जणांना बरोबर न घेता गुपचूप पांडुरंगाचं दर्शन घेतो. मुख्यमंत्री असताना कधीही शासकीय महापूजा चुकवली नाही, असं शरद पवार म्हणाले होते.

‘मी वारीपासून लांब असतो असं बोललं जातं, पण मला कोणत्याच गोष्टीचं अवडंबर केलेलं आवडत नाही. कधी पंढरपूरजवळ गेलो तर फार लोकांना बरोबर घेऊन न जाता गुपचूप पांडुरंगाचं दर्शन घेतो. याचे फोटो प्रसिद्ध व्हावेत, अशी माझी इच्छा नसते. राज्याची जबाबदारी माझ्यावर होती तेव्हा कधीही शासकीय पूजा चुकवली नाही,’ असं एका कार्यक्रमात शरद पवारांनी सांगितलं होतं.