अखेर शरद पवारांना नमते घ्यावेच लागले, राजीनामा देण्याचा निर्णय मागे

निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत असल्याची पत्रकार परिषदेत केली घोषणा

मुंबई, ५ मे  / प्रतिनिधी :-  माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारले तरी कोणतेही जबाबदारीचे पद घेणार नाही, पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे, असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आपण अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची व पुनश्च अध्यक्षपदाची जबाबादारी स्वीकारत असल्याचे जाहीर केले.

image.png

यावेळी पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “२ मे २०२३ रोजी ‘लोक माझे सांगाती’ या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या विमोचन समारंभाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मी जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती.

परंतु मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसामध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे ‘सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरिता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. देशभरातून व विशेषतः महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी आग्रही विनंती केली.

‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास याने मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे असे ठरवले, या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.

मी पुनश्च अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते, असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमानसापर्यंत पोहचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करेन.

आपण सातत्याने दिलेली हाथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यश-अपयशात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे पुनश्च जाहीर करतो.”

अजित पवार हे पत्रकार परिषदेस अनुपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार हे पत्रकार परिषदेस अनुपस्थित होते. त्याबाबत विचारले असता, शरद पवार यांनी म्हटले की, निवृत्त होण्याचा विचार व्यक्त केल्यानंतर पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले होते. अजित पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. आज अजित पवार इथं नाहीत म्हणजे ते नाराज असं म्हणण्याचं काहीच कारण नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

शरद पवार यांनी २ मे रोजी लोक माझ्या सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर देशभरात राष्ट्रवादी नेते-कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आग्रह धरला. राज्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. तर नेत्यांनी राजीनामा सत्र सुरु ठेवले होते. एवढेच नाही तर ग्रामीण भागातील लोकांनी फोन करून, त्यांना प्रत्यक्ष भेटून विनवणी केली. तर काहींनी रक्तांने पत्र लिहून निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांची मनधरणी करताना शरद पवार यांनी त्यांच्या मनासारखा निर्णय घेतला जाईल यासाठी तीन दिवसांचा कालावधी मागितला होता.

शरद पवारांचा राजीनामा फेटाळला!

image.png

‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचा अनपेक्षित निर्णय जाहीर केला. याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. पवार यांनी नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी समिती गठीत केली. या समितीची आज बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला की, आदरणीय खा. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत आहे. पक्षाध्यपदी पवार यांनीच राहावे अशी विनंती सर्वानुमते करण्यात येत आहे. हा ठराव पवार यांची भेट घेऊन त्यांच्या समोर मांडण्यात आला . त्यावर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात आला , अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

देशाला, राज्याला, पक्षाला पवार यांची गरज आहे. पक्षाचे आधारस्तंभ तुम्हीच आहात. त्यामुळे पवार हेच पक्षाध्यक्षपदी असावे, अशी सर्वांची भावना असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.