एकट्या अजित पवारांचा शरद पवारांच्या निर्णयाला पाठींबा, कार्यकर्त्यांना झापले, सुप्रियालाही बोलू दिले नाही

कार्यकर्त्यांना म्हणाले, “रडारड करू नका, हे कधी ना कधी होणार होतं..”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते भावूक झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. त्यावर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांना झापले आणि इतर नेत्यांपेक्षा वेगळे मत मांडले.

यावेळी अजित पवार म्हणाले की पवार साहेब नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी देऊ पाहत आहेत. काँग्रेस मध्ये खर्गे अध्यक्ष आहेत तरी पण सोनिया गांधी काम करतात. पवार यांनी सांगितले, भाकरी फिरवयाची आहे, ते बोलले आहेत. पवार साहेब असताना नवीन अध्यक्ष हा काही काळात शिकेल. कुणीही अध्यक्ष झाले तरी साहेबच अध्यक्ष राहतील.

साहेबांच्या नेतृत्वाखालीच आणि मार्गदर्शनानुसार नवीन अध्यक्ष काम करील. काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. उद्या नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब राजकारणातील त्याला बारकावे सांगतील. साहेबांच्या नजरेसमोर नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको रे, असा सवाल विचारत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना अश्रू ढाळण्याचे कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणार होता. रडारड करण्याचे कारण नाही. साहेबांनी निर्णय घेतला आहे. त्यांच्या मनात आहेत त्याच गोष्टी होतील, असा सज्जड दम वजा इशारा कार्यकर्त्यांना दिला.

शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद…त्या भावूक क्षणी कार्यकर्त्यांना…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. त्यांच्याकडे खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विनंती करुनही कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. अखेर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना थेट फोन लावला आणि फोनच्या लाऊडस्पीकरवरुन शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

“तुम्ही आत्ता सगळे तिथे बसला आहात. माझा तुम्हाला आग्रह आहे की तुम्ही सगळ्यांनी जेऊन घ्या. त्यानंतर मी तुमच्याशी बोलायला येईन. ” असं म्हटल्यावर कार्यकर्ते शांत झाले. त्यावर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की आम्ही हेच सांगायला तुम्हाला आलो होतो पण तुम्ही विश्वास ठेवला नाहीत. सुप्रिया सुळे यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना ऋणानुबंध या ठिकाणी जायला सांगितलं.