पवारांचा हा निर्णय म्हणजे वैयक्तिक; फडणवीसांची सावध प्रतिक्रिया

मुंबई ;-राज्याच्या राजकीय वर्तुळात शरद पवार यांच्या या निर्णयानंतर खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होताना शरद पवार यांनी आतापासून कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. शरद पवार यांच्या लोकमाझे संगती या राजकीय आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती मुंबईत पार पडली. त्यावेळी शरद पवार यांनी या घोषणा केल्या. यानंतर कार्यकर्ते आणि नेते भावूक झाले. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी आग्रही विनंती करण्यात आली. राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध भाष्य केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा शरद पवार यांचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. याबाबत चर्चा व विचारमंथन सुरू असल्याचे दिसते. पक्षाचा निर्णय कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येत नाही. यावर आताच भाष्य करणे अकाली ठरेल. त्यामुळे यावर भाष्य करणार नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्य वेळी उत्तर दिले जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. या प्रकरणात संयम बाळगणे आवश्यक आहे. हे का होतंय, कसं होतंय आणि पुढे काय होणार आहे, हे कळेल तेव्हाच यावर भाष्य करू, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.