मविआची वज्रमूठ सभा; महाराष्ट्र दिनी शक्तीप्रदर्शन:राणेंचे चॅलेंज उद्धव ठाकरेंनी भर सभेत स्वीकारले

अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

मुंबई,१ मे  / प्रतिनिधी :-  बारसू प्रकल्पावरुन कोकणात राजकीय शिमगा पहायला मिळणार आहे. बारसू रिफायनरीला होणा-या विरोधावरून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. उद्धव ठाकरे यांनी भर सभेत नारायण राणे यांचे चॅलेंच स्वीकारले आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. बारसू जाणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी तारीख देखील जाहीर केली आहे. तसेच पत्राबाबतही उद्धव ठाकरे यांनी खुलासा केला आहे. 

महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी बारसू, बुलेट ट्रेन तसंच आरे मेट्रो कारशेडवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. आता महाराष्ट्रात बारसूचा विषय भडकला आहे, येत्या 6 तारखेला मी बारसूला जाऊन लोकांना भेटणार आहे आणि बोलणार आहे. कसं काय तुम्ही मला आडवू शकता?. काय आहे बारसूमध्ये, तो काय पाकव्याप्त काश्मिर नाही. तो माझ्या महाराष्ट्राचा भाग आहे. 6 तारखेला बारसूला जाणार आहे आणि त्यानंतर सभा घेणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी पवार यांच्या अंमलाखाली गेलो, असं ही लोक सांगत होती. आज उदय सामंत हे शरद पवार यांना भेटून आले. काय करू, काय करू असं विचारात आहात. बारसूचं पत्र दाखवून बारसू बारसू करत असाल आणि स्वत: बारसं करून घेताय. तुम्ही कराल ते योग्य आणि आम्ही जाऊन भेटून आलो तर लगेच चुकीचं, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

आपलं सरकार गेलं आणि त्यांनी बीकेसीची सोन्यासारखी जागा ही बुलेट ट्रेनच्या घशात घातली. आज किती लोक अहमदबादला जाणार आहेत. कुणासाठी हे करात आहात? आपलं सरकार आल्यानंतर मेट्रो कारशेडची जागा थांबवली होती. माझा हेतू स्वच्छ होता, पर्यावरणाचा ऱ्हास न होता कांजूरमार्गची आणखी मोठी जागा मिळत असेल तर अंबरनाथपर्यंत विस्तार करणार होतो. पण ही लोक कोर्टात केली. केंद्र सरकार सुद्धा कोर्टात गेलं. जागा अडून ठेवलं. आता कांजूरमार्गमध्येही कारशेड उभारणार आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी केला पत्राचा उल्लेख 

6 मे ला बारसूला जाणार घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकेर यांनी भाषणात  पत्राचा देखील उल्लेख केला. 6 तारखेला बारसूला जाऊन बारसूच्या लोकांना भेटून बोलणार आहे. बारसू पाकिस्तान किंवा बांगलादेशचा भाग नाही. उद्धव ठाकरे यांनी जागा सुचवली होती असं माझ्या नावाचं पत्र नाचवलं जात आहे. पण, त्या पत्रात पोलिसांनी कारवाई करावी असं म्हटलेल नाही. पण स्थानिकांच्या विरोधात हा प्रकल्प व्हावा, असं पत्रात म्हटलं नव्हतं, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

आमच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करणाऱ्यांविरोधात आम्ही बोलणारच. महाविकास आघाडीच्या वज्रमुठीचा हिसका पाहिला आहे. विधान परिषद, बाजार समिती निवडणुक, कसबा, अंधेरी निवडणुक. सर्व निवडणुकीत चारी मुंड्या चित केले आहे.  अनेक जण अद्याप बाळासाहेबांना भेटले देखील नाहीत तरी देखील त्यांच नाव घेऊन राजकारण करतात.

मुंबईच्या BKC ची जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली. बुलेट ट्रेनने किती लोक अहमदाबादला जातील. कोण प्रवास करणार या बुलेट ट्रेनने. मी बुलेट ट्रेनसाठी कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव सुचवला होता. यामुळे हा प्रवास बदलापूरपर्यंत विस्तारता आला असता. माझा प्रकल्पाला नाही तर जागेला विरोध होता.  महाराष्ट्रापासून मुंबई तोडणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. सर्व उद्योगधंदे मुंबई बाहेर नेण्याचा यांचा डाव आहे. 

…यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

महाराष्ट्रात आजपर्यंत झाला नाही इतका भ्रष्टाचारी कारभार सुरु आहे असा गंभीर आरोप राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांचा वारेमापपणे वापर केला जात आहे. याआधीच्या मुख्यमंत्र्यांनी जाहिरातीबाजीवर केला नाही, तितका जनतेचा पैसा गेल्या 10 महिन्यात खर्च झाला आहे असाही आरोप अजित पवार यांनी केला आहे. मुंबईत वज्रमूठ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला उद्धव ठाकरे, संजय राऊत, अशोक चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील असे महाविकास आघाडीचे सर्व मोठे नेते उपस्थित आहेत. यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. 

“मुंबईचं मराठीपण टिकवण्यात आणि मान सन्मान कोणी वाढवला असेल तर तो दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेमुळे मुंबई टिकली, मराठी माणसाचा स्वाभिमान राहिला हे वास्तव नाकारुन चालणार नाही. नेमकं हेच काही लोकांच्या डोळ्यात खुपलं. सध्याचं सरकार पाहता संविधान, घटना, कायदा राहणार आहे का याचा विचार तुम्हाला करायचा आहे,” असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. “सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने चांगलं यश मिळवलं आहे. जनता आपल्या पाठीशी आहे. सर्वांनी एकत्रित यांचा सामना करायचा आहे,” असंही अजित पवारांनी सांगितलं. 

पोटनिवडणुका असेल किंवा बाजार समिती निवडणुकीत आपण चांगलं यश मिळवलं असून जनता आपल्यासोबत आहे. आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. कोरोनाच्या संकटात आपण चांगलं काम केलं. आर्थिक शिस्त आम्ही कुठेही मोडली नाही. 31 मार्च 1 हजार कोटींची बिलं या सरकारने देण्याची थांबवली आहे. कंत्राटदारांना यांनी थांबवलं, कोण याला जबाबदार आहे? असा सवाल अजित पवारांनी विचारला.

माझा शेतकरी तिथे अडचणीत आहे, पण त्यांना मदत करण्याची सरकारीच भूमिका नाही. शिंदे फडणवीस काय करत आहेत? त्यांचं काम नाही का? शेतकऱ्यांची पिक उद्धवस्त झाली आहेत, परंतु, त्यांना मदत करण्याची भूमिका या सरकारची नाही. फडणवीस शिंदे काय करत आहेत, त्यांचं हे काम नाही का? पण यांना बाकीच्या कामांमध्ये रस आहे, अशी टीका अजित पवारांनी केली.