पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ च्या १०० व्या भागाच्या पूर्वसंध्येला मुंबईचा मानबिंदू गेट वे ऑफ इंडिया येथे विशेष सोहळ्याचे आयोजन

मुंबई,२९  एप्रिल / प्रतिनिधी :-  पंतप्रधानांच्या ‘मन की बात’च्या १०० व्या भागाच्या निमित्ताने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने देशभरातील विविध वारसा स्थळांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले. मुंबईमध्ये २९ एप्रिलच्या संध्याकाळी ऐतिहासिक स्मारक असलेल्या गेटवे ऑफ इंडिया येथे एक सोहळा साजरा करण्यात आला.

संस्कृती मंत्रालयांतर्गत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सूर्यास्ताच्या वेळी झाली आणि यामध्ये या स्थळावर प्रोजेक्शन मॅपिंगचा समावेश होता. ध्वनी आणि प्रकाशाच्या या शोमध्ये गेटवे ऑफ इंडियाची त्याच्या उभारणीच्या कामापासून ते पूर्णत्वापर्यंतची गाथा दाखवण्यात आली. किंग जॉर्ज पाचवे यांच्या स्वागतासाठी 1911 मध्ये इंडो-इस्लामिक शैलीत उभारण्यात आलेल्या गेटवे ऑफ इंडियाने महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेहून मायदेशी परतण्याच्या आणि 1948 मध्ये ब्रिटिशांची शेवटची तुकडी भारत सोडून जात असल्याच्या घटनांसह अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत.

त्यानंतर या शोमध्ये पंतप्रधानांनी ऑक्टोबर 2014 मध्ये सुरू केलेल्या ‘मन की बात’ च्या नावीन्यपूर्ण उपक्रमावर भर देण्यात आला. विविध भागांमधील कहाण्यांचे आकर्षक पद्धतीने कथन करण्यात आले. माननीय पंतप्रधान आणि सामान्य जनता यांच्याकडील कल्पनांची अतिशय सहजतेने उपलब्ध असलेल्या रेडियो या माध्यमाच्या मदतीने देवाणघेवाण करण्याचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम खरोखरच प्रभावी ठरला.   

मन की बात कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून, ज्यात दसऱ्याच्या दिवशी हृदयातील अशुद्धी काढून टाकण्याच्या संदेश देण्यात आला ते स्थानिक कला आणि कलाकार, पद्म पुरस्कार विजेते ज्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते अशा सगळ्या भागांचा यावेळी आढावा घेण्यात आला.  2015 मध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांचे विचार सामायिक करण्यासाठी मन की बात कार्यक्रमाच्या एका भागात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे 99 भाग यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत आणि 100 वा भाग 30 एप्रिल रोजी सकाळी प्रसारित होणार आहे.

गेटवे ऑफ इंडियाच्या समोरील भागात एक संवादात्मक माहिती किओस्क आणि डिजिटल अभिप्राय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. या दोन्हींच्या माध्यमातून विद्यार्थी आणि अभ्यागत “मन की बात” चे आधीचे 99 भाग ऐकू शकतात आणि आपल्या सूचना देऊ शकतात. मन की बातच्या भागांचे छोटे प्रदर्शनही या परिसरात भरवण्यात आले होते.

मुंबईच्या दक्षिण विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अभिजीत देशमुख, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. शुभ मजुमदार आणि केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक, तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई मंडळाच्या कर्मचार्‍यांसह विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

शैक्षणिक संस्था, मुंबई विद्यापीठ, एनएसएस, केंद्रीय विद्यालय कुलाबा आणि इतर स्थानिक शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे यश या कार्यक्रमात साजरे करण्यात आले.