हनुमान चालिसाचे १०० महिलांनी केले २१ पाठ

अयोध्या येथे लवकरच होणार श्रीराम महायज्ञ सोहळा: विजय पाटणूरकर

छत्रपती संभाजीनगर ,२९  एप्रिल / प्रतिनिधी :-समर्थनगर येथील श्रीराम मंदिरात आज शनिवार रोजी तब्बल १०० महिलांनी २१ वेळा श्री हनुमान चालिसाचे पठण केले. यासाठी त्यांना दोन ते तीन तासांचा अवधी लागला. त्यानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. अयोध्या येथे लवकर श्रीराम महायज्ञ सोहळा होणार असून त्यासाठी हनुमान चालिसा पठण सोहळा आयेाजित करण्यात आला होता.

         प्रत्येकाच्या अंतःकरणात श्रीराम प्रभूंचे नाव कोरलेले आहे. श्री राम प्रभू भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि भारतीय जनतेचे केंद्रबिंदू आहेत. याच श्रीराम प्रभूंच्या जन्मभूमीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उदात्त हेतूने महाराष्ट्रातील श्रीराम भक्तांसाठी श्रीक्षेत्र आयोध्या येथे श्रीराम महायज्ञ सोहळा करण्याचे ठरवले आहे. सर्वसामान्यांना रामललाचे दर्शन व्हावे, जन्मभूमीचा इतिहास माहिती व्हावा यासाठी लवकरच तेरा कुंडी यज्ञ अयोध्या येथे होणार आहे. याच धर्तीवर या हनुमान चालीसा पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी १० वाजता महिलांनी हनुमान चालिसा पठणास सुरूवात केली होती. सदरील पठण तीन तास चालले. रामरक्षा व विष्णूसहस्त्रनामचे वाचन करण्यात आले. नंतर लगेच आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माजी न्यायाधीश विजय पाटणूरकर, अ‍ॅड. तुकाराम जोशी, सुर्यकांत रत्नपारखी यांच्यासह साधना पाटणूरकर, शिला जोशी, कविता देशपांडे, ऊषा देशपांडे, छाया रत्नपारखी, अंजली पांडे यांनी परिश्रम घेतले.