स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास पुस्तकातून सर्वांसमोर आला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन 

मुंबई,२०  एप्रिल / प्रतिनिधी :-  स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती, त्याग, त्यांचे बलिदान कुठल्याही शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यांचा त्याग सर्वश्रुत आहे. त्यांनी केलेले देशकार्य शब्दांच्या पलिकडे आहे. असा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास उदय निरगुडकर अनुवादित ‘वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’  या पुस्तकातून सर्वांसमोर आला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर व चिरायू पंडित यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या ‘द मॅन व्हू कुड प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे उदय निरगुडकर यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ‘वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असलेला महापुरुष’ या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

कार्यक्रमाला व्यासपीठावर खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री आशिष शेलार, अतुल भातखळकर, नितेश राणे, सदा सरवणकर, पुस्तकाचे मूळ लेखक तथा केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर,  लेखक उदय निरगुडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर समजायचे असतील तर हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे. सावरकरांच्या बाबतीत ब्रिटिशांच्या मनात भीती होती. त्यांना दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा त्यांनी सुनावली. सावरकर यांनी अंदमानच्या कारागृहात अत्यंत हाल अपेष्टा सहन केल्या  त्याचा विचारही केला तरी आपल्या अंगावर शहारे येतात. अशा या राष्ट्रनायकाची २८ मे रोजी येणारी जयंती राज्यात दिमाखात साजरी झाली पाहिजे. या माध्यमातून त्यांची देशभक्ती घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मात्र हे कार्य त्यांच्या देशभक्ती व कर्तृत्वापुढे कमीच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेतून त्यांचा इतिहास, देशभक्ती, त्याग सर्वांपुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला.

कार्यक्रम प्रसंगी आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, उदय निरगुडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन स्वप्निल सावरकर यांनी केले.