मी राष्ट्रवादीत आहे:”आता काय मी ॲफिडेव्हिटवर लिहून देऊ?” भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर अजित पवारांचा संताप

यत्कींचितही तथ्य नाही, खोट्या बातम्या पसरवू नका

अजित पवारांच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले,”जी काही चर्चा तुमच्या मनात आहे”

मुंबई,१८  एप्रिल / प्रतिनिधी :-  “माझ्याबद्दल आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम सुरु असून या चर्चांना काहीही अर्थ नाही,” असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व्यक्त केले. गेले काही दिवस अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावरून अखेर आज माध्यमांसमोर त्यांनी स्वतः आपले मत व्यक्त केले. “जिवंत जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीचेच काम करत राहणार आहे. आता या चर्चांना पूर्णविराम लावा. आता काय मी ॲफिडेव्हिटवर लिहून देऊ का?” असा संताप त्यांनी व्यक्त केल्या.

“राष्ट्रवादीमध्ये अनेक चढउतार आले पण सध्या सुरु असलेल्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असून पक्षातच राहणार आहोत. काही राष्ट्रवादीचे आमदार हे मला कामासाठी भेटण्यास आले होते. तर याचा वेगळा अर्थ काढू नये,” असेही अजित पवारांनी स्पष्ट केले. “१९९९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानाने स्थापना झाली आहे. तेव्हापासून आम्ही काम करत आहोत. जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पक्षाचे काम करत राहणार आहोत. “प्रत्येकाने आपले काम करत रहा. आपापल्या भागात पक्ष कसा वाढवता येईल? यासाठी प्रयत्न करा,” असे आवाहनदेखील यावेळी त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांच्या सह्या घेतल्याचे वृत्त खोटं आहे. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत आहेत, हे सुद्धा धादांत खोटे आहे. आता काय मी राष्ट्रवादीत आहे हे स्टँम्प पेपरवर एफीडेविट लिहून देऊ काय, असे संतप्त होऊन अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळले. मीडिया स्वत:च्या मनाने बातम्या चालवत आहे, असे अजित पवार म्हणाले.

अजितदादांनी संजय राऊतांनाही झापले

आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेण्याची काहीही आवश्यकता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वत:चे प्रवक्त आहेत, नेते आहेत. ते पक्षाची भूमिका मांडतील, अशा शब्दांत अजित पवार यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना खडे बोल सुनावले आहेत.

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर सूचक वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या भेटीचा उल्लेख करत या लेखात संजय राऊतांनी म्हटले होते की, राष्ट्रवादीतून कुणाला भाजपमध्ये जायचे असल्यात त्याची ती वैयक्तिक भूमिका असेल. पण पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतरच अजित पवारांभोवती पुन्हा संशयाचे धुके निर्माण झाले होते. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊ शकतात, अशा चर्चांना ऊत आला होता.

पत्रकार परिषदेत या चर्चांचे खंडन करताना अजित पवार म्हणाले की, माझ्याबाबत आणि माझ्या सहकाऱ्यांबाबत मुद्दामहून गैरसमज पसरवले जात आहेत. एका पक्षाच्या मुखपत्रातूनही माझ्या बंडावर काहीही चर्चा केली गेली. तुम्हाला आमचे वकीलपत्र घेण्याची काय आवश्यकता आहे. आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमच्या पक्षात ज्येष्ठ नेते, प्रवक्ते आहेत ना. ते आमची भूमिका मांडतील. उगीच काहीतरी बोलून संभ्रम का निर्माण करत आहात.

संजय शिरसाटांनाही सुनावले खडेबोल

अजित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनाही खडेबोल सुनावले. संजय शिरसाट म्हणाले होते की, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागत आहे. पण ते राष्ट्रवादी पक्षासोबत आले तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावरही अजित पवारांनी चांगलाच संताप व्यक्त केला.अजित पवार म्हणाले, अरे मी अजून कुठे गेलेलो नाही. कुठे आलेलो नाही. त्याआधीच ते आले तर आम्ही जाऊ, अशी भाषा का करत आहात? माझी काही भूमिका असेल तर मी ती स्वत: मांडेन ना. मी स्वत: पत्रकार परिषदेत माझी भूमिका मांडेन. त्याआधीच माझ्या येण्यावर येवढी काय चर्चा करताय. काही लोकांचे माझ्यावर एवढे काय प्रेम आहे, हेच मला समजेनासे झाले आहे.

अजित पवारांच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले,”जी काही चर्चा तुमच्या मनात आहे”

गेले काही दिवस राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशामध्ये त्यांच्या हालचालींकडे प्रसार माध्यमांचे लक्ष असून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडलेल्या घडामोडींवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. असे असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यावर प्रतिक्रिया अली असून त्यांनी याबाबत आपले मौन सोडले आहे. ते म्हणाले, “या सगळ्या चर्चा तुमच्या मनात असून राष्ट्रवादीच्या मनात असे काही नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, ” सध्या या चर्चा सर्व तुमच्या मनात आहेत, राष्ट्रवादीच्या कोणाच्याही मनात असे काही नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नसून कोणीतरी बातम्या तयार करण्याचे काम करत आहे. त्याला काहीही अर्थ नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. पुढे ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसे करू शकतो? याचाच विचार करत आहेत. याशिवाय दुसरा कोणताही विचार कोणाच्या मनात नाही,” असे पुन्हा एकदा त्यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, “मी असे वाचले की राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक वगैरे आहे. ही बातमी १०० टक्के खोटी असून अशी कोणतीही बैठक नाही. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष हे सध्या मार्केट कमिटी निवडणुकीच्या प्रचारांमध्ये व्यस्त आहेत. मी या सगळ्या गोष्टींवर आता स्पष्टपणे सांगितल्यानंतर त्यामध्ये कोणालाही फाटे फोडण्याचा अधिकार नाही,” असे त्यांनी खडसावले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल आणि मी असे आम्ही एकत्रित भेटलो होतो. त्यासंदर्भात वेणुगोपाल हे उद्धव ठाकरे आणि मला भेटण्यासाठी मुंबईला येणार होते. देशपातळीवर विरोधकांची बैठक व्हावी आणि काही कार्यक्रम तयार करावा याची चर्चा करण्यासाठी तसेच या बैठकीचे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. माझी खात्री आहे की श्री. ठाकरे आणि राज्यातील आम्ही सर्वजण राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहू. यासंदर्भात असलेल्या सामूहिक कार्यक्रमात आम्ही सर्व सहभागी असू, अशी माहिती पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.