नीट (NEET) सह कोरोनाचीही परीक्षा दयायची असल्याने विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत

लातूर,दि.12 :- राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत रविवार दिनांक 13 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 02.00 ते सायंकाळ 05.00 वाजेपर्यंत जिल्हयातील 43 केंद्रावर NEET(UG) परीक्षा 2020 चे आयोजन करण्यात आलेले आहे. परंतु संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात होऊन हाहाकार माजलेला आहे. लातूर जिल्हयात ही कोरोनाचा प्रसार होत असून जिल्हा प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. तरी जिल्हयातील सर्व परीक्षा केंद्रावर नीट (NEET) ची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी “नीट” सह कोरोनाची ही परीक्षा दयावयाची असल्याने योग्य ती दक्षता घ्यावी. व नीटसह कोरोनाच्या परीक्षेतही उत्तीर्ण व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.

देशभरात नीट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. आपण यावर्षीची परीक्षा कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ “नीट”चीच नव्हे तर कोरोनाची परीक्षा उत्तीर्ण करावयाची आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या प्रतिबंधासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे सांगून जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेचा अभ्यास व पूर्व तयारी केलेली असेलच पण आता कोरोनाच्या परीक्षेचीही थोडीशी तयारी करावी लागेल. त्यासाठी मास्क वापरणे,सॅनिटायझर व इतरांपासून किमान सहा फूटाचे शारिरीक अंतर राखणे अत्यंत गरजेचे आहे.

लातूर जिल्हयात 43 केंद्रावर 16 हजार 884 विद्यार्थ्यांसाठी नीट ची परीक्षा आयोजीत केली आहे. विद्यार्थ्यांनी केंद्र शासन, राज्य शासन व राष्ट्रीय परीक्षा एजन्सी तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. विद्यार्थ्यांनी घरातूनच निघताना नाक व तोंड पूर्णपणे झाकेल असा मास्क वापरावा.सोबत किमान 50 मिली ची सॅनिटायझरची बॉटल ठेवावी. तसेच घरातून निघताना ते परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देई पर्यंत कोणापासूनही किमान सहा फूटाचे शारिरीक अंतर ठेवावे. एखादया केंद्रावर विद्यार्थ्यी मास्क आणण्यास विसरला असेल तर परीक्षा केंद्रावर अशा विद्यार्थ्यांसाठी मास्क ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु विद्यार्थ्यांनी घरातून मास्क आणणे अधिक उचित ठरेल, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले.

परीक्षा केंद्रावर परीक्षा देणाऱ्या विद्यर्थ्यांनी फक्त पाण्याची बॉटल आणायची आहे.त्याशिवाय इतर कोणतीही वस्तू (उदा.पॅड,पेन इ.) सोबत आणू नये. एखादया विद्यार्थ्यांला ताप असल्याचे निर्दशनास आल्यास त्या विद्यार्थ्याला वेगळया खोलीत विलगीकरणात बसून परीक्षा देता येणार आहे. मात्र जो विद्यार्थी कोव्हिड पॉझिटिव्ह असेल तर अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अजिबात येऊ नये.त्या विद्यार्थ्यांनी [email protected] या मेल वर आपली आवश्यक ती माहिती पाठवावी, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *