“…म्हणून मी अंडरग्राऊंड झालो”; बेपत्ता झालेला राज मुंगासे आला समोर

रॅपर राजेश मुंगसेच्या पाठीशी उभे राहणार – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर,१२  एप्रिल / प्रतिनिधी :-  येथील रॅपर राज मुंगासे याच्याविरुद्ध व्हिडिओमधून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबद्दल अपशब्द आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधून राज मुंगसे बेपत्ता असल्याचे सांगितले होते. यानंतर आज तो माध्यमांसमोर आला असून त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

रॅपर राज मुंगासे म्हणाला की, “पोलिसांकडून मला अटक झालीच नाही. पण छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा फोन आला आणि त्यानंतर ते माझ्या घरीही गेले. मी केलेला तो रॅप व्हिडीयो डिलीट कर आणि माफीनामाचा व्हिडीयो सोशल मीडियावर टाक, असे सांगत माझ्यावर त्यांच्याकडून दबाव टाकण्यात आला. पण मी त्या व्हिडियोमध्ये काहीच चुकीचे बोललेलो नाही. मी कोणत्याही व्यक्तीची बदनामी केलेली नाही. मला तो व्हिडियो डिलीट करायचा नव्हता म्हणून मी तिथून निघून गेलो होतो.” असे स्पष्टीकरण त्याने दिले.

तो म्हणाला की, “मी कुठे आहे हे माझ्या कुटुंबामध्ये कोणालाच माहिती नव्हते. माझ्या घराचे हळवे असल्यामुळे मी त्यांना सांगितले नाही. त्यांना सांगितले तर ते आजूबाजूला सांगतील म्हणून मी सांगितले नाही. मला पोलीस ताब्यात घेतील आणि तेव्हा सलग ३ दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे मला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करायलाही मिळाले नसते म्हणून मी लपून राहिलो.” असे त्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, सत्र न्यायालयीन राज मुंगासेला अटकेपासून संरक्षण दिले आहे. न्यायालयाने २५ एप्रिलपर्यंत त्याला अटक करू नये, असे निर्देश दिले असून त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर महाराष्ट्र पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

रॅपर राजेश मुंगसेच्या पाठीशी उभे राहणार – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

रॅपर राजेश मुंगसेला कोर्टाकडून जामीन मंजूर झाला असून यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्या पाठीशी उभी राहणार असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली.राजेश मुंगसे याने पन्नास खोके वरती रॅप सॉंग तयार केलं, त्यामुळे त्याच्यावर सत्ताधारी पक्षातील लोकांनी गुन्हा दाखल केला होता. 

त्याने वैयक्तीक कोणावर टिका केली नाही.  इंग्रज काळात ही अशी कारवाई केली नाही, त्याच्यापुढे जाऊन सत्ताधारी हे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे टीकास्त्र दानवे यांनी केले.राजेश मुंगसे याने त्याच्या रॅपमध्ये कोणाच नाव घेतल नाही किंवा अपशब्दाचा प्रयोग केला नाही. अशा प्रकारे गुन्हा दाखल करण योग्य नाही. एकप्रकारे सत्ताधारी लोकशाहीचा अपमान करत आहेत, अशी टीका दानवे यांनी केली.ज्यांनी तक्रार केली त्यांच्या ट्विटरवर वरती ही पन्नास खोकेचा मॅसेज आहे. बैलांच्या अंगावर पन्नास खोके लिहिण्यात आले होते, नवरात्री मध्ये ही अनेक महिलानी ५० खोके म्हणाल्या, मग प्रत्येकावर कारवाई करणार का असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला.  याविरोधात कायदेशीर लढा लढणार असल्याचे दानवे म्हणाले.