चलो अयोध्या! ठाण्यातून सुमारे दोन हजार शिवसैनिक अयोध्येला रवाना

मुख्यमंत्री शिंदेंकडून ट्रेनला हिरवा झेंडा

अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ’ मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी

ठाणे ,७  एप्रिल / प्रतिनिधी :-   सुमारे दोन हजार शिवसैनिक एका विशेष ट्रेनने शुक्रवारी अयोध्येला रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे स्टेशनला हजर झाले होते. यावेळी त्यांनी या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. जय श्री राम आणि शिवसेनेच्या घोषणा देत कार्यकर्ते या विशेष ट्रेनने अयोध्याला रवाना झाले.

यावेळी त्यांच्या सोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, बालाजी किणीकर आदींसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. या विशेष ट्रेनने ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, कल्याण येथील शिवसैनिक रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी शिवसेनेचे खासदार, मंत्री आणि आमदार अयोध्येला उपस्थितीत राहणार आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे रविवारी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना आपल्या विभागात महाआरती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा हा राज्य आणि देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते अगोदरच अयोध्येत तळ ठोकून बसले आहेत.

दरम्यान, १६ डब्यांची विशेष एसी लोकल ठाणे स्थानकातून शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास रवाना झाली. यावेळी कार्यकर्तेंचा पेहराव देखील काही आगळावेगळा होता. अनेकांनी जय श्री रामाचे टी शर्ट परिधान केले होते. जय श्री रामाचा जयघोषही यावेळी करण्यात आला. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील हाती भगवा झेंडा घेतला होता. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शिंदे यांनी आर्वजून भेट घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ९ एप्रिलला अयोध्या दौरा; घेणार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ९ एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याची जोरदार तयारी शिंदे गट समर्थकांनी सुरु केली आहे. जाहीर केलेल्या नियोजनानुसार, मुख्यमंत्री शिंदे हे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर या दौऱ्यावर असताना ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेटदेखील घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून यासंदर्भातील एक व्हिडियोदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते प्रभू श्रीरामाचे दर्शन, तसेच हनुमान गढीचे दर्शन घेणार आहेत. यावेळी ते मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी करून शरयू आरती केल्यानंतर मुंबईसाठी परतणार आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे कार्यकर्त्ये ८ एप्रिलला अयोध्येकडे रवाना होणार आहेत. त्यांच्यासाठी खास एक रेल्वेही बुक करण्यात आली आहे. तर, मुख्यमंत्री शिंदे ९ एप्रिलला अयोध्येत जाणार आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी अयोध्या दौऱ्याआधी व्हिडियो प्रदर्शित केला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर टीकादेखील केली. ते म्हणाले की, “माझ्या दौऱ्यामुळे मी सर्वांना कामाला लावले आहे. घरात बसणाऱ्यांना मी बाहेर काढले आहे,” असा टोला लगावला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “जवळपास ३ हजारांहून अधिक शिवसैनिक, रामभक्त या ट्रेनने अयोध्येत पोहचणार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मी स्वतः या कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे.”