किराडपुरा दंगल : आणखी चार दंगलखोरांना पोलिस कोठडी

छत्रपती संभाजीनगर,१  एप्रिल / प्रतिनिधी :-  श्रीराम नवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरातील किराडपुरा भागात झालेल्या दंगलीची विशेष तपास पथकामार्फत तपास सुरु असून विशेष पथकाने शनिवारी दि.१ एप्रिल रोजी आणखी चार दंगलखोरांना गजाआड केले. चारही दंगलखोरांना सोमवार दि.३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एस. वानखेडे यांनी दिले.

इमरान खान बिस्मिल्ला खान (३४, रा. बायजीपुरा), सय्यद कलीम सय्यद सलीम (२२, रा. रहेमानिया कॉलनी), करीम सलीम शेख (२६, रा. गल्ली क्रं.४, संजयनगर) आणि अन्‍वर खान कादर खान ऊर्फ सोनु (२८, रा. किराडपुरा) अशी आरोपींची नावे आहेत.

गुन्‍हा गंभीर असुन आरोपींच्‍या पसार साथीदारांना अटक करायची आहे. गुन्‍ह्यात वापरलेले लाठ्या-काठ्या, सळया हस्‍तगत करायच्‍या आहेत, गुन्‍ह्याचा नेमका हेतूकाय होता याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी न्‍यायालयाकडे केली होती.

छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात तरुणांच्या दोन गटात गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर जाळपोळ, दगडफेक आणि हाणामारीत झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार, अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला होता. या दंगलीनंतर संभाजीनगर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत श्रीराम नवमीचा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडला होता. या उत्सवादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था स्थिती अबाधित राखण्यात पोलिसांना यश आले.

या घटनेनंतर पोलीस आयुकृत निखिल गुप्‍ता यांनी तपासासाठी एसआयटी नेमली. यात सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सात पोलिस अधिकारी आणि तीन पोलिस कर्मचान्यांचे पथक या दंगलीची चौकशी करीत आहेत . दरम्यान, या दंगलीस कारणीभूत असलेल्या २० ते २५ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून सीसीटिव्‍ही फुटेज आणि सीडीआरच्‍या आधारे एसआयटीने तपास करुन  चौघा आरोपींना बेड्या ठोकल्या.