वैजापुरात पालिकेतर्फे महिलांचा ‘स्वच्छता मशाल मार्च’

शहरातून जनजागृती फेरी ; स्वच्छता राखण्याचा महिलांचा संकल्प 

वैजापूर ,२९ मार्च / प्रतिनिधी :- स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत नगर परिषद वैजापूर स्वछोत्सव 2023 च्या अनुषंगाने कचरा व थुंकी मुक्त शहर ठेवण्यासाठी तसेच नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा व घनकचरा वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये ठेवण्याच्या प्रक्रियेसाठी पालिकेतर्फे बुधवारी (ता.29) महिलांचा ‘स्वच्छता मशाल मार्च’ काढून शहरात जनजागृती करण्यात आली.

या स्वछता जागृती मार्चला पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत (राजपूत), धोंडीरामसिंह राजपूत व राहुल साठे यांनी ध्वज दाखविला. शहराच्या विविध भागातून स्वच्छता जनजागृती करीत हा मार्च स्टेशन रस्त्यावरील पालिका बागेत नेण्यात आला. या ठिकाणी स्वच्छता दूत धोंडीरामसिंह राजपूत यांनी जंतू आणि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी हाताची स्वच्छता, परिसर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापनात सुरक्षित आणि वैज्ञानिक पद्धतीचा वापर याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपमुख्यअधिकारी राहुल साठे व राजपूत यांनी सहभागी महिलांना स्वच्छता मशाल मार्च मध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र ही प्रदान केले. महिलांनी स्वच्छतेत सातत्य राखण्याचा संकल्प केला. काही महिलांनी कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केले त्यांनाही प्रमाणपत्र वितरित करण्यात  आले.