आमदार संजय  शिरसाट यांना घेरले :शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंविरुद्ध अर्वाच्य भाषेत टीका केल्याप्रकरणी आमदार संजय शिरसाट यांच्या  विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची पोलिस ठाण्यात तक्रार  

महिला आयोगाकडून चौकशी

सुषमा अंधारेंवर टीका करताना शिरसाट म्हणाले, “तिने काय लफडी केली…”

‘लफडं’ शब्द घोटाळा अर्थाने वापरला, संजय शिरसाट यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर,२८ मार्च  / प्रतिनिधी :-  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध अर्वाच्य भाषेत टीका केल्याप्रकरणी आमदार संजय शिरसाठ यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशा तक्रारीचे पत्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजी नगर पोलिस ठाण्यात दिले आहे.    २६ मार्च रोजी आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध अत्यंत अर्वाच्य भाषेत टीका केली असल्याचे माध्यमातून समोर आले. त्यामुळे शिरसाठ यांच्या विरोधात भा.दं. वि. च्या कलम ३५४(अ)अनव्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दानवे यांनी लेखी स्वरूपात केली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी तातडीने तक्रारीची दखल घेऊन ४८ तासांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले आहेत. 

संजय शिरसाठ यांच्या विरोधात शिवसेना उद्धव गटाच्या महिला आघाडीचे आंदोलन

संजय शिरसाट च करायचं काय खाली मुंडक वर पाय

काळे झेंडे दाखवून महिलांनी केला निषेध व्यक्त

शिंदे गटाच्या शिवसेनेचा मेळावा नुकताच शहरांमध्ये पार पडला या मेळाव्यात आमदार संजय शिरसाठ यांनी शिवसेनेच्या(उ.बा.ठा) उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या विषयी अश्लील अपशब्द वापरल्यामुळे शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत असून आज महिला आघाडीच्या वतीने क्रांतीचौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय शिरसाट यांच्या तोंडाला शेण लावून, त्याचप्रमाणे संजय शिरसाठ यांच्या फोटोला जोडे मारून महिलांनी आपला संताप व्यक्त केला.”महिलांचा अवमान करणाऱ्या शिंदे सरकार हाय हाय”,  “संजय शिरसाट हाय हाय” , “संजय शिरसाटच करायचं काय खाली मुंडक वर पाय”, “पन्नास खोके खाऊन खाऊन माजलेत बोके” या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महिलांनी हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला.


यावेळी जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप यांनी शिंदे सरकार मधील मंत्री लोकप्रतिनिधी कायम महिलांच्या बाबतीत अपशब्द वापरत असतात या आधी सुद्धा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी मंत्री अब्दुल सत्तार यांनी, सुषमाताई अंधारे यांच्या विषयी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आता परत सुषमाताई अंधारे यांच्या विषयी संजय शिरसाठ यांनी अश्लील भाषेमध्ये गरळ ओकली आहे, यावरून शिंदे सरकारमधील लोकप्रतिनिधींचे संस्कृतीचे दर्शन महाराष्ट्राला घडत असून अशा प्रकारे शिंदे सरकार मधील लोकप्रतिनिधी महिलांचा अपमान करत असतील तर आम्ही महिला हे कदापी सहन करणार नाही, याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, आम्ही बाळासाहेबांच्या तालमीत घडलेल्या शिवसेनेच्या रणरागिणी आहोत, वेळ पडली तर यांच्या तोंडाला काळे फासायलाही आम्ही मागे पुढे पाहणार नाही असा इशारा प्रतिभा जगताप यांनी दिला.

या आंदोलन प्रसंगी  उपजिल्हा संघटिका अनिता मंत्री, दुर्गा भाटी, शहर संघटिका विद्या अग्निहोत्री, अशा दातार, सुनिता सोनवणे, विधानसभा संघटिका मीरा देशपांडे, मीरा पाटील, सुचिता आंबेकर,सुकन्या भोसले, सारिका शर्मा, लता त्रिवेदी, मीना थोरवे, विद्या खाडीलकर, मीरा चव्हाण, स्मिता रामचंद्र, छाया जाधव, मीनल राणे, सविता आंभोरे, विमल आव्हाड, शोभा बडे, कांता गाडे, इंदिरा कदम, आशा भामरे, मीरा कदम, प्रेम लता चंदन, प्रतिभा राजपूत, उषा कोरडे, सुनिता गरुड, आरती साळुंखे, मनीषा खरे ,रेखा शाह ,नीता शेळके, संध्या रावलेलू, रोहिणी काळे, संगीता पवार, वैशाली आरट ,कमल भरड, भारतीय हिवराळे, मंदा भोकरे, रेणुका जोशी, कविता मठपती, प्रेम लता चंदन आदी महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.——-

सुषमा अंधारेंवर टीका करताना शिरसाट म्हणाले, “तिने काय लफडी केली…”

एका जाहीर कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर केली. ते यावेळी म्हणाले की, “ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. अब्दुल सत्तर, भुमरे सगळेच माझे भाऊ आहेत. पण तिने काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहिती,” असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत जोरदार टीका झाली. तसेच, सुषमा अंधारेंनी या विधानाबद्दल महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही म्हंटले होते.

यावर संजय शिरसाट स्पष्टीकरण देत म्हणाले की, “मी काय चुकीचे बोललो? ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी सुषमा अंधारेंना माझ्या घरी बोलवून बहीण म्हणून साडीचोळी दिली आहे. आम्ही नाती जपणारी माणसं आहोत. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये ‘संज्या’, ‘घोडा’ असे म्हणता, ते तुमच्या संस्कृतीला शोभते का? तुम्हाला हा अधिकार दिला आहे का?,” असा सवाल त्यांनी यावेळी केला. “माझ्यासाठी सत्ता महत्वाची नसून मी चुकीचे काहीही बोललो असल्याचे सिद्ध केल्यास मी लगेच माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी तयार आहे.” असे आव्हान त्यांनी केले आहे.”महिलेचा अपमान झाला असल्याचे म्हटले जात आहे. पण जर महिला आहे तर महिलेसारखे बोलले पाहिजे. गुलाबराव पाटीलांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना शिव्या दिल्या, अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनादेखील शिव्या दिल्या. आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन अशाप्रकारे शिव्या देण्याचे कंत्राट यांना कोणी दिले? महिला म्हणून आम्ही काहीच बोललोच नाही, पण त्याचा बाऊ करण्यात आला. यांची पार्श्वभूमी जर पहिली तर यांनी आत्तापर्यंत काय-काय विधाने केली याचे रेकॉर्डिंग आहेत.” असा इशारा त्यांनी दिला.

‘लफडं’ शब्द घोटाळा अर्थाने वापरला, संजय शिरसाट यांचा दावा

‘लफड’ शब्द घोटाळा अर्थाने वापरला, असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. गेली उडत आमदारकी म्हणत विरोधकांना इशाराही दिला आहे. अपशब्द वापरल्याचे सिद्ध करा, मी आमदारकीचा राजीनामा देईल असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. अंधारे ठाकरेंबाबत काय म्हणाल्या हे देखील पाहायला हवे, अंधारेंना शिव्या देण्याचे कंत्राट कुणी दिले, असा सवाल आमदार संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.

शिवसेनेचे (शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्त्व्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आज त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊतांविरोधात महिला आघाडीने निदर्शने केली नाहीत, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.