वैजापूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जनसंवाद बैठक ; ग्रामस्थांनी वाचला उणिवांचा पाढा

वैजापूर ,२७ मार्च / प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालय यांची सेवा तळागाळातील घटकापर्यंत पोहचावी.त्याना उत्तम आरोग्य सेवा मिळावी व ग्रामीण भागातील आरोग्य सेवामधील त्रुटी समन्वयाने दूर व्हाव्यात म्हणून मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्यावतीने राष्ट्रीय ग्रामीण अभियानअंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरुनाथ इंदूरकर व जिल्हा आरोग्य सुकाणू समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.27) येथील पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, त्यांचे सहायक व त्या गावचे ग्रामस्थ यांचा  तालुकास्तरीय जन संवाद कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमात मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या समन्वयक अन्नपूर्णा ढोरे यांनी गावकऱ्यांनी उपस्थित केलेले 74 मुद्दे सादर केले. यात बहुतेक मुद्दे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरणे, आरोग्य केंद्रात स्वच्छता पाळणे व रुग्णांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे तसेच रुग्णांना 102 व 108 नंबरची रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध करून देणे,  1एप्रिल,2023 पूर्वी जनआरोग्य समिती गठीत करणे व त्याची यादी आरोग्य केंद्र बाहेर लावणे, सोडिअल ऑडिट करणे, आरोग्य कर्मचारी वर्गाने मुख्यालयी राहणे इत्यादी मुद्दे उपस्थित करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरुनाथ इंदूरकर यांनी या बाबी आठ दिवसात पूर्ण होतील असे आश्वासन दिले. धोंडिरामसिंह राजपूत यांनी आरोग्य कर्मचारी यांना रुग्ण सेवा प्रामाणिकपणे द्यावी असे आवाहन केले. या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य विनायक गाढे, नारायणराव भोपळे, रमेश चव्हाण, प्रभाकर जाधव, कडू पवार, बाळासाहेब चव्हाण, सदाशिव बुधे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. साईनाथ बारगळ, बापू वाळके यांनी सहभाग नोंदविला. अन्नपूर्णा ढोरे यांनी समारोप केला.उपजिल्हा रुग्णालयाचे आठ विषय होते परंतु त्यांचे कोणीही प्रतिनिधी न आल्याने हे विषय चर्चिले गेले नाहीत. त्यांना पत्र देऊनही उपजिल्हा रुग्णालय यांनी या जनसंवाद मध्ये पाठ फिरविल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.