“सावरकर हे आमचे दैवत आहे, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.”-राहुल गांधींना उद्धव ठाकरेंचा इशारा

मालेगाव  ,२६ मार्च  / प्रतिनिधी :-  महाविकास आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. नुकतेच त्यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी, “मी माफी मागायला सावरकर नाही, मी गांधी आहे आणि मी माफी मागणार नाही,” असे विधान केले होते. यावरून आता महाविकास आघाडीचेच नेते उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना इशारा दिला आहे. मालेगावच्या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “सावरकर हे आमचे दैवत आहे, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.” असा इशारा राहुल गांधींना दिला आहे.

सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, “राहुल गांधींना मला एक जाहीर सांगायचे आहे की, तुम्ही कन्याकुमारीपासून ते कश्मीरपर्यंत गेलात. आम्ही प्रत्येकवेळी तुमच्यासोबत होतो. ही लढाई लोकशाहीसाठी आहे. परंतु, सावरकर आमचे दैवत असून त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आपण देशाचे संविधान वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत. त्याला आता फाटे फुटू देऊ नका. तुम्हाला डिवचले जाते, पण आता वेळ चुकली तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी यावेळेस दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “काल राहुल गांधींची पत्रकार परिषद बघितली. त्यांनी प्रश्न विचारला की, २० हजार कोटी रुपये कोणाचे? यावर भाजपकडे उत्तर नाही. हिंडेनबर्गने हजारो कोटींचे घोटाळे बाहेर काढले, पण त्यावर पंतप्रधान मोदी गप्प आहेत. पण इकडे घोटाळ्यांसाठी ईडी, सीबीआय आणले जाते. पण हजारो कोटींच्या घोटाळ्यावर काहीच बोलत नाही.” असे म्हणत त्यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.