राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द

भारतीयांचा आवाज बनून यापुढेही लढत राहू -राहुल गांधी

लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी; चार वर्षांपूर्वीच्या मानहानी खटल्यात दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली, २४ मार्च/प्रतिनिधीः- केरळच्या वायनाड लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व शुक्रवारी रद्द करण्यात आले. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत गांधी यांचे सदस्यत्व २३ मार्च, २०२३ पासून रद्द करण्यात आले आहे, असे म्हटले.

घटनेचे कलम १०२ (१) आणि जन प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ अंतर्गत सदस्यत्व रद्द केले गेले आहे. गुरुवारी राहुल गांधी यांना सूरतमधील न्यायालयाने मानहानिच्या खटल्यात दोषी ठरल्याबद्दल दोन वर्षांचा तुरूंगवास व १५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती  दिली. न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी गांधींना हा वेळ मिळाला आह.

वर्ष २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कर्नाटकमधील कोलार येथे राहुल गांधी यांनी मोदी यांचे थेट नावच घेतले होते. त्याबद्दलच त्यांना दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली. गांधी म्हणाले होते की, सगळ्या चोरींची आडनावे मोदी का असतात, मग ते ललित मोदी असतील किंवा नीरव मोदी किंवा नरेंद्र मोदी.

राहुल गांधींचे सदस्यत्व का गेले?

कलम १०२ (१) आणि १९१(१) अनुसार जर संसद किंवा विधानसभा सदस्य लाभाचे कोणते पद घेत असेल, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे, दिवाळखोर आहे किंवा वैध भारतीय नागरिक नसेल तर त्याचे सदस्यत्व रद्द होते.

अपात्रतेचा दुसरा नियम घटनेच्या दहाव्या अनुसूचीत आहे. त्यात पक्ष-बदलाच्या आधारावर सदस्यांना अपात्र ठरवण्याची तरतूद आहे.

याशिवाय लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ अंतर्गत संसद सदस्य किंवा विधिमंडळ सदस्याचे सदस्यत्व जाऊ शकते. या कायद्यानुसार फौजदारी खटल्यात शिक्षा झालेला संसद किंवा विधिमंडळ सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद आहे.

लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१

लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ चे कलम ८ (१) नुसार दोन समुहांत शत्रूत्वाला वाढवणे, लाच घेणे किंवा निवडणुकीत आपल्या प्रभावाचा गैरवापर केल्यास सदस्यत्व जाऊ शकते.

उत्तर प्रदेशमध्ये रामपूरचे आमदार आजम खान यांचे सदस्यत्व ऑक्टोबर २०२२ मध्ये रद्द केले गेले. त्यांना हेट स्पीचच्या खटल्यात न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

कलम ८ (२) नुसार साठेबाजी, नफेखोरी, खाण्यापिण्याच्या गोष्टींत भेसळ, हुंडाबंदी अधिनियमांक दोषी ठरल्यास कमीतकमी ६ महिन्यांची शिक्षा मिळाल्यास सदस्यत्व रद्द होते.

कलम ८ (३) अंतर्गत व्यक्ती दोषी ठरली आणि तिला दोन वर्षांची किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास ती सभागृहाच्या सदस्यत्वास अपात्र ठरते. अंतिम निर्णय सभागृहाच्या सभापतींचा असेल.

तरतूदीनुसार संसद सदस्य किंवा विधानसभा, विधानपरिषद सदस्य दोषी ठरवला गेल्याच्या तारखेपासून अपात्र समजला जाईल. त्याची तुरूंगातून सुटका झाल्यापासून ६ वर्षे तो अपात्रच राहील. याचा अर्थ राहुल गांधी दोन वर्षांचा तुरूंगवास आणि त्यानंतर सहा वर्षे निवडणूक लढवू शकणार नाही.

तो अध्यादेश राहुलचे सदस्यत्व वाचवू शकला असता

सष्टेंबर, २०१३ मध्ये राहुल गांधी यांनी एका अध्यादेशाला निरर्थक म्हटले होते. तोच अध्यादेश आज त्यांचे सदस्यत्व वाचवू शकला असता. तेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने हा अध्यादेश आणला होता. त्यात म्हटले होते की, काही अटींनुसार न्यायालयात दोषी ठरल्यानंतरही खासदार किंवा आमदार अपात्र ठरवला जाऊ शकणार नाही. त्यावेळी राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी ‘कलंकित संसद सदस्य आणि आमदारांसाठी आणण्यात आलेला या अध्यादेशाला निरर्थक म्हणत याला फाडून फेकून द्यायला हवे, असे म्हटले होते.

राहुल गांधी तेव्हा म्हणाले होते की, “या देशात लोक खरोखर भ्रष्टाचाराशी लढू इच्छित असतील तर आम्ही अशा छोट्या तडजोडी नाही करू शकत.”

राहुल गांधींचे म्हणणे होते की, ”जेव्हा आम्ही एक लहानशी तडजोड करतो तेव्हा आम्ही सगळ्या प्रकारच्या तडजोडी करायला लागतो.”

कोणाकोणाचे गेले सदस्यत्व?

लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फ़ैजल यांचे सदस्यत्व ११ जानेवारी, २०२३ मध्ये गेले. केंद्रशासित प्रदेशातील एका न्यायालयाने त्यांना हत्येच्या प्रयत्नांतील खटल्यात १० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती.

रशीद मसूद (काँग्रेस) यांना वर्ष २०१३ मध्ये एमबीबीएस सीट घोटाळ्यात दोषी ठरल्यावर राज्यसभा सदस्यत्व गमवावे लागले.

लालू प्रसाद यादव २०१३ मध्ये चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यावर त्यांचे लोकसभा सदस्यत्व संपले. जनता दलाचे (युनाइटेड) जगदीश शर्मा चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यावर २०१३ मध्ये त्यांना लोकसभा सदस्यत्व सोडावे लागले.

समाजवादी पक्षाचे आजम ख़ान यांचा मुलगा अब्दुल्ला आज़म यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाले. निवडणूक लढवताना त्यांनी स्वतःचे वय जास्त दाखवून चुकीचे शपथपत्र दिले होते.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे आमदार विक्रम सैनी यांना वर्ष २०१३ मध्ये दंगलीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेल्यावर त्यांचे सदस्यत्व गेले होते.

भारतीयांचा आवाज बनून यापुढेही लढत राहू -राहुल गांधी

नवी दिल्ली: खासदारकी गमावल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पहिली प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी राहुल गांधींनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. राहुल गांधींचे निकटवर्तीय असलेल्या नेत्यांबरोबरच त्यांची बहिण प्रियंका गांधी यांनीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या आई आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही राहुल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहचल्या आहेत. राहुल गांधींनी खासदारकी गमावल्यानंतर त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन अगदी मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राहुल गांधींनी, आपण भारतीयांचा आवाज बनून यापुढेही लढत राहू आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास आपण तयार आहोत असं म्हटलं आहे.