चोराला चोर म्हणणे गुन्हा; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई,२४ मार्च  /प्रतिनिधी :-मानहाणी प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर आता राहुल गांधींना मोठा धक्का बसला. त्यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करून त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्यभर या निर्णयाविरोधात काँग्रेस आक्रमक झाले असून महाविकासआघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. अशामध्ये आता उद्धव ठाकरे यांनीदेखील याबद्दल टीका करताना, “चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे” असे म्हणत टोला लगावला आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत म्हंटले की, “चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे फिरत आहेत आणि राहुल गांधींना शिक्षा ठोठावली गेली आहे. लोकशाहीचे हे हत्याकांड असून सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात असून आता फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल.” अशी टीका त्यांनी केली आहे.

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील

देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याची खासदारकी तडकाफडकी रद्द करण्याचा प्रसंग हा भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. देशात विरोधकांना चिरडण्याची नवी पद्धत सुरु झाली आहे. हे पटवून देताना जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पी.पी. मोहम्मद फैजल यांचे उदारहण दिले.

आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची खासदारकी तात्काळ रद्द करण्याची घाई लोकसभेत झाली आहे. अशा अनेक घटना घडल्या आहेत. केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून ईडी, सीबीआय तसेच इतर यंत्रणांचा गैरवापर करण्याचे काम सुरु आहे. यातून व्यक्तिस्वातंत्र्याचा गळा दाबण्याचे काम होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

आजपर्यंत डिफेमेशनसाठी सहा महिन्यांवर शिक्षा झाली असे मागील सत्तर वर्षात ऐकायला मिळाले नव्हते. त्यामुळे आता राहुल गांधींनी केलेल्या विधानावर दोन वर्षांची शिक्षा होणे ही बाब गंभीर आहे. राहुल गांधी यांना याविरोधात अपील करण्याची एकही संधी न देता हे काम झाले आहे. राहुल गांधींनी लोकसभेत येऊन बोलू नये हाच सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न दिसतोय, असे ते म्हणाले. लोकसभेची दारं राहुल गांधींना बंद करण्याचे काम दिल्लीत सत्तेत बसलेल्या लोकांनी केलं. भारतात अशा पद्धतीच्या वागणुकीला देशाने नेहमी शिक्षा केली आहे. त्यामुळे या निर्णयामागे असलेल्यांना शिक्षा केल्याशिवाय भारतीय लोकशाही व लोकशाहीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणारी जनता स्वस्थ बसणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकांसाठी अवघा एक वर्षाचा काळ राहिला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या मागे देशातील लोक उभे राहू नयेत याचा आटोकाट प्रयत्न सुरु असावा, त्याचा हा एक भाग आहे. मात्र या गोष्टीची प्रतिक्रिया फार वेगळी येईल आणि देशाची जनता राहुल गांधींच्या मागे उभी राहील, असा दावा त्यांनी केली.

भारतीय जनता पक्ष हा पक्ष नसून निवडणुक जिंकण्याचे यंत्र आहे, असा शेरा जयंतराव पाटील यांनी मारला. केवळ निवडणुका जिंकण्याच्या मोडमध्ये भारतीय जनता पक्ष असतो. लोकांची सेवा करणे अथवा लोकहिताचे निर्णय घेणे यापेक्षा विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे काम देशाच्या वेगवेगळ्या भागात सुरु आहे. मात्र देशातील सर्व विरोधी पक्ष यामुळे अधिक ताकदीने संघटित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.