राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यावरून महाविकास आघाडीच्या आमदारांचा  सभात्याग

मुंबई,२४ मार्च  /प्रतिनिधी :-काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यावरून राज्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन अधिवेशन सुरु असताना सभात्याग केला. मतमतांतरं असतील तरी देशात स्वातंत्र्यानंतर अशाप्रकारे कोणाची खासदारकी रद्द करण्याची घटना पाहण्यात नाही, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. ही बाब संविधानात वा लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार घटनेने आपल्याला दिला आहे. तरीदेखील संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जो लोकशाहीला धक्का देणारा आहे, असे म्हणत या भूमिकेचा त्यांनी निषेध केला.

महापुरूषांनी आपल्याला घटना दिली. त्यांनी दिलेल्या शिकवणीत अशी भूमिका बसत नाही. हे सर्व प्रकार जनता बघत आहे. राज्यकर्त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन जायचे असते. या देशाच्या परंपरेला तिलांजली देण्याचे काम झाले. आताच्या काळात ज्या घटना घडत आहेत त्या सर्वसामान्य जनतेला पटणाऱ्या नाहीत, असे अजितदादा म्हणाले.

‘गुजरातचा निरमा, क्लीनचीट मिळवा’ ‘५० खोके एकदम ओके…’ अशी घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात आक्रमक होत केली.