आम्हाला मिंधे म्हणता, चोर-गद्दार म्हणता त्याचे काय?-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना सवाल

मुंबई : तुम्ही जर आमच्या पंतप्रधानांचा अपमान करणार असाल, तर या देशातील जनता आणि आम्ही सहन तो सहन करणार नाही. काल विधिमंडळाच्या आवारात जो प्रकार घडला त्याचे समर्थन आम्ही करत नाही. याबाबत आमची बैठकही झाली आहे. मात्र मागील आठ महिन्यांपासून आमचे फोटो लावून खोके म्हणणे, आम्हाला चोर म्हणणे, मिंधे म्हणणे, गद्दार म्हणणे हे कोणत्या आचारसंहितेत बसते, असा सवाल करत सदनाचा मान-सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे. बोलताना सर्वांनी तारतम्य बाळगले पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री शिंदे यांनी विधीमंडळात निवेदन दिले.

राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्याच्या प्रकारामुळे दुस-या दिवशीही विधिमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी करत विरोधक आक्रमक झाले आहेत. तर सत्ताधारी सुद्धा त्यांना सडेतोड प्रत्त्युत्तर देत आहेत. यामुळे काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर विरोधकांना उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: सत्ताधा-यांची बाजू मांडताना संतापाच्या भरात विरोधकांवर जोरदार प्रहार केले.

पंतप्रधान मोदी यांच्या आईचा अंत्यविधी झाल्यानंतर ते लगेच कर्तव्यावर गेले. राष्ट्रभक्ती, देशभक्ती त्यांच्या नसानसात असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ज्यांनी ज्यांनी गेले आठ महिने आमच्या लोकांचा अपमान केला त्याचं काय? असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. कारवाई करायची असेल तर सर्वांवर झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना खोके म्हणणे, मिंधे म्हणणे, चोर म्हणणे हे कोणत्या आचारसंहितेत बसते नाना?, असा प्रश्न त्यांनी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना उद्देशून केला.

आम्ही कालच्या प्रकाराचे कधीच समर्थन केले नाही. मात्र, सावरकरांचा अपमान करणे हा सुद्धा देशद्रोहच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. या देशाचा मान आणि देशाची कीर्ती पोहोचवण्याचे काम प्रधानमंत्र्यांनी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लोकशाही धोक्यात असेल तर भारत जोडो यात्रा कशी काढली? जम्मू काश्मीरमध्ये झेंडा फडकावला ना? असे सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसला केले. इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. त्यांचाही आम्ही अभिमान बाळगतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो त्यावेळी तीन बोटे आपल्याकडे असतात. त्यामुळे आमचीही विनंती आहे, की सभागृहाचे पावित्र्य जपा. सभागृहाच्या बाहेर सुद्धा कोणतेही काम होऊ नये. त्याला आक्षेप घेतला पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.