मुख्यमंत्र्यांचा वारंवार अपमान करणा-या विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गर्भित इशारा वजा आव्हान

फडणवीस संतापले! कारवाई करायची आणि तुम्हाला जर वाढवायचेच असेल तर…

मुंबई : राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्याच्या प्रकारामुळे दुस-या दिवशीही विधिमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी करत विरोधक आक्रमक झाले आहेत. तर सत्ताधारी सुद्धा त्यांना सडेतोड प्रत्त्युत्तर देत आहेत. यावर विधान परिषदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले होते. यावरुन काँग्रेस नेते जोरदार आक्रमक झाले आहेत. ज्या सदस्यांनी हे केले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू घेत विरोधकांवर निशाणा साधला. अशा प्रकारे विधानभवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलन हे चुकीचेच आहे. त्याचे समर्थन मी करत नाही. पण गेल्या सहा महिन्यांपासून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली जात आहे. त्यांना खोके, चोर, मिंधे म्हणणे हे सभागृहाला मान्य आहे का. कारवाईच करायची असेल तर मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारे बोलणाऱ्यांवर देखील पहिली कारवाई केली पाहिजे. दोन्ही बाजूने विचार झाला पाहिजे, असे असे फडणवीस म्हणाले.

त्यावर काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनी वरच्या सभागृहातील नेते यामध्ये सामील होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. यावरही फडणवीसांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. हे जर वाढवायचे असेल तर मुख्यमंत्र्यांवर बोलणाऱ्यांवर देखील कारवाई करावी लागेल, असे म्हणत त्यांनी विरोधकांना गर्भित इशारा दिला. वरच्या सभागृहातील लोक हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देण्यात पुढे होते त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांचा वारंवार अपमान करणा-या विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गर्भित इशारा वजा आव्हान दिले.