लातूर ते नांदेडपर्यंतच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,२४ मार्च  /प्रतिनिधी :-लातूर – नांदेड ब्रॉडगेज रेल्वे मार्ग हा मराठवाड्यातील प्रमुख शहरे लातूर व नांदेडला रेल्वे मार्गाने थेट जोडण्यासाठीचा प्रकल्प आहे. या रेल्वे प्रकल्पाची लांबी 91.3 कि.मी.असून अंदाजे किंमत 3 हजार 12 कोटी एवढी आहे. लातूर ते नांदेड थेट विद्युतीकरणासह नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्पाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

यासंदर्भात विधानसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्याच्या ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी आणि हे प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावेत या उद्देशाने निवडक रेल्वे प्रकल्पामध्ये प्रकल्प खर्चाच्या 40 ते 50 टक्के आर्थिक सहभाग देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. या रेल्वे मार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य राजेश पवार, प्रशांत बंब, बालाजी कल्याणकर, अनिल देशमुख, देवयानी फरांदे यांनी सहभाग घेतला.