मुंबईत माहीममध्ये अवैध दरगाह महापालिकेकडून जमीनदोस्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या धमकीनंतर १२ तासांतील कारवाई

काल राज ठाकरेंचं अल्टिमेटम, आज प्रशासनाची धडक कारवाई

मुंबई, २३ मार्च/प्रतिनिधीः- मुंबई महानगरपालिकेने माहीमच्या खाडीतील अवैध दरगाहला गुरुवारी जमीनदोस्त केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी जाहीरसभेत या दरग्याचा उल्लेख केल्यानंतर १२ तासांत ही कारवाई केली गेली. अवैध दरगाह उभा केला जातोय व महिनाभरात तो काढला नाही तर तेथे गणपतीचे मंदिर उभे केले जाईल, असे ते म्हणाले होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पथक मोठा पोलिसफाटा, जेसीबी आणि इतर साहित्य घेऊन घटनास्थळी गेले व त्याने अज्ञात व्यक्तिच्या नावाने असलेले थडगे (मझार) काढून टाकले. हे थडगे माहीमच्या समुद्र किनाऱ्यापासून काही मीटरवरील अगदी लहान बेटावर होते. पथकाने पांढरे आणि हिरवे झेंडे लावलेले खांब व मझारच्या अवतीभवती असलेली खासगी मालमत्ता बुलडोझरने पूर्णपणे काढून टाकली.

तत्पुर्वी, पथकाने माहीमधील ६०० वर्षे जुन्या हजरत मखदूम शाह बाबा रादियाल्लाहुअहूच्या विश्वस्तांशी या विषयावर चर्चा केली व त्यांनी जवळच्या बेटावर कोणत्याही बेकायदा गोष्टींना नाहिसे करण्यासाठी पूर्ण पाठिंबा असल्याचे पथकाला सांगितले. ही मझार हिरवे कापड, फुलांच्या माळा आणि फुलांच्या चादरीने झाकलेली होती. या ठिकाणी काही भाविक समुद्रात काही मीटर्सवर गुडगाभर पाण्यात जाऊन प्रार्थना करीत.

कान उपटल्यावर कारवाई

राज ठाकरे यांनी राज्य सरकार, मुंबई पोलिस आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाचे जाहीरसभेत त्या दरगाहमुळे सुरक्षेला असलेल्या छुप्या धोक्याकडे लक्ष वेधून कान उपटल्यानंतर सकाळी ही कारवाई झाली. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी महानगरपालिकेचे या कारवाईबद्दल स्वागत केले तर राज्य भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांनी त्या विषयाकडे लक्ष वेधून राज्य सरकारचे डोळे उघडल्याबद्दल अभिनंदन केले. महिनाभरात जर तो दरगाह काढून टाकला गेला नाही तर तेथे मनसे त्याच जागेवर गणपती मंदिर उभे करील असा मनसेपद्धतीचा अंतिम इशारा  राज ठाकरे यांनी दिला होता.

सुरक्षेला होता धोका

दरग्यामुळे सुरक्षेला असलेल्या धोक्याकडे लक्ष वेधताना ठाकरे म्हणाले होते की, “माहीम पोलिस ठाणे त्याच्या अगदी जवळ आहे, महानगरपालिकेचे अधिकारी त्या भागात ये जा करतात आणि तरीही गेल्या दोन वर्षांपासून समुद्रात निर्लज्जपणे दरगाह उभा राहतोय. आणखी एक हाजी अली दरगाह. आणि त्याबद्दल कोणी बोलणार नाही?”
लाव रे तो व्हिडीओ

राज ठाकरे यांनी या जाहीरसभेत पाच वर्षांनंतर लाव रे तो व्हिडीओचा प्रयोग केला. या व्हिडीओत त्यांनी ड्रोनने शूट केलेली क्लीप दाखवली. हा ड्रोन त्या छोट्या बेटावर आणि अवतीभवती फिरवला गेला होता. त्यात स्पष्टपणे माहीम समुद्रात मझार स्पष्टपणे उभारल्याचे दिसते. त्या क्लीपमध्ये काही हिरवे आणि पांढरे झेंडे उंच खांबावर दिसतात. काही मोजके पुरूष व महिला भाविक तात्पुरत्या बनवलेल्या थडग्यावर प्रार्थना करताना दिसतात.