समृध्दी महामार्गावर शिवराई नजीक बोलेरो जीपची दुचाकीला धडक ; काका-पुतणी ठार

पालखेड गावावर दुसऱ्यांदा शोककळा 

वैजापूर ,२३ मार्च / प्रतिनिधी :- बोलेरो जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील काका व पुतणीचा मृत्यु झाला. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी नागपूर मुंबई महामार्गावर शिवराई शिवारात घडली.‌ नारायण कारभारी शेळके (वय 45 वर्ष) व पुजा वेणुनाथ शेळके (वय 21 वर्ष ) अशी मृतांची नावे असुन ते वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील रहिवासी होते. नारायण हे गुरुवारी दुपारी पुतणी पुजा हिला घेऊन दुचाकीवर (एमएच 20 एफई 4061) वैजापुरहुन पालखेडला जात होते. शिवराई शिवारात लासुरहुन वैजापुरच्या दिशेने येणाऱ्या बोलेरो जीपने (एमएच 25 आर 3554) त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत नारायण व पुजा हे दोघे जागीच ठार झाले. अपघाताची वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन पोलिस उपनिरीक्षक रज्जाक शेख व संतोष सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत