भिवंडी सीजीएसटी आयुक्तालयाने 19 कोटी रुपयांच्या आयकर फसवणूक प्रकरणी ओपो मोबाईल कंपनीच्या वित्तीय व्यवस्थापकाला केली अटक

मुंबई,२२ मार्च  /प्रतिनिधी :-मेसर्स ओपो (OPPO) मोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, या मूळ चीनी कंपनीचा व्यवस्थापक आणि वित्त आणि लेखा विभागाचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता,  महेंद्र कुमार रावत याला, बनावट पावत्यांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिटची 19 कोटीची फसवणूक केल्या प्रकरणी, सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने अटक केली आहे. मुंबई विभागातील सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी आज (22.03.23) रावत याला अटक केली आणि त्याला 03.04.23 पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. तपासादरम्यान प्राप्त झालेल्या  पुराव्यांच्या आधारे, सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत आज त्याला अटक करण्यात आली.

सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाच्या फसवणूक विरोधी शाखेने मेसर्स ओपो मोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (GSTIN – 27AABCO9247K1ZZ) ची चौकशी केली. यामधून ओपो (OPPO) महाराष्ट्र, कोणत्याही मालाची पावती न घेता बनावट ITC मिळवत असल्याचे उघडकीला आले आहे. ओपो (OPPO) मोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा पुरवठादार, असलेली मेसर्स गेन हिरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी आपल्या व्यवसायाच्या प्रमुख ठिकाणी अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. या संदर्भात, या व्यवहाराची सोळा ई-वे बिले (सीमा शुल्क पावत्या) पडताळण्यात आली, आणि ती बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर, वाहतूकदार आणि वाहन मालक यांचे जबाब नोंदवण्यात आले. यामधून, ओपो महाराष्ट्रला मालाचा पुरवठा होत नसल्याचे उघड झाले.

या प्रकरणी, कंपनीचे व्यवस्थापक आणि वित्त आणि लेख विभागाचे अधिकृत स्वाक्षरीकर्ता,  महेंद्र कुमार रावत, प्रमुख आरोपी असून, त्याने गेन  हिरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ने कोणताही माल न घेता जारी केलेल्या 107,08,56,072/- रुपयांच्या ITCच्या बदल्यात, 19,27,54,093/-  रुपयांच्या बनावट पावत्या मिळवल्या होत्या. या पावत्या बनावट असल्याचा जबाब त्याने नोंदवला आहे. हे प्रकरण, सीजीएसटी मुंबई विभागाने कर फसवणूक करणार्‍या आणि कर चुकवणार्‍यांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. आतापर्यंत सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने गेल्या 18 महिन्यांतच 24 जणांना अटक केली आहे, अशी माहिती केंद्रीय जीएसटी भिवंडीचे आयुक्त सुमित कुमार यांनी दिली.