रेमडेसिवीर, टॉसीलीझुमॅब विक्रीची नियमित माहिती विक्रेत्यांनी द्यावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद, दि.08 :- कोरोना उपचारांमध्ये रेमडेसिवीर, टॉसिलीझुमॅब या इंजेक्शन्सचा वापर केल्या जात आहे. त्यादृष्टीने त्याची पूरेशी उपलब्धता नियंत्रीत करणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर औषध विक्रेत्यांनी या औषधांच्या विक्रीबाबतची माहिती नियमितपणे अन्न व औषध प्रशासनास द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना औषधविक्री बाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, अन्न औषध प्रशासनाचे सहसंचालक एस.एस. काळे, औषध निरिक्षक जे. डी. जाधव, आर.एम.बजाज, यांच्यासह औषध विक्रेता संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी औषध विक्रेत्यांनी तसेच औषध पुरवठा करणाऱ्यांनी विक्री आणि शिल्लक औषधांबाबतची माहिती नियमितपणे अन्न व औषध प्रशासनास द्यावी. त्याचसोबत ताप, सर्दी, खोकला, या आजारांसाठी औषध खरेदी करणाऱ्यांची नाव, वय, पत्ता, संपर्क क्रमांक यांची माहिती औषध विक्रेत्यांनी नोंदवणे बंधनकारक आहे. याप्रमाणे संबंधितांव्दारे नोंदी ठेवल्या जात असल्याची पाहणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याने वेळोवेळी करावी. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतेही औषध विक्री करू नये याची कटाक्षाने औषध विक्रेत्यांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देशही श्री. चव्हाण यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *