पेट्रोल-डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक किंवा फ्लेक्स इंधनावर चालणारी वाहने खरेदी करा:नितीन गडकरी यांचे आवाहन

नवी दिल्ली : वाढते प्रदूषण आणि भविष्यात होणारी इंधन टंचाई लक्षात घेता देशातील पेट्रोल-डिझेलवरील वाढते अवलंबित्व आणि वाढते प्रदूषण कमी करण्याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने किंवा फ्लेक्स इंधनावर चालणारी वाहने खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

येत्या ५ वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व पूर्णपणे संपवायचे आहे. एलएनजी, सीएनजी, बायोडिझेल, हायड्रोजन, इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर चालणारी वाहने लोकांनी वापरावीत, हे माझे उद्दिष्ट आहे, असे रस्ते आणि परिवहन मंत्री गडकरी एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले.

येत्या ५ वर्षात देशातून पेट्रोल आणि डिझेलची गरज संपुष्टात आणण्यासाठी मी काम करत असून तुमच्या पाठिंब्याशिवाय ती पूर्ण करणे शक्य नाही, असे गडकरी यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, काही काळापूर्वी लोक इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग आणि आव्हानांबद्दल बोलत असत. पण आता काळ बदलला आहे. इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ खुली झाली असून आता लोकांना त्यांची वाहने घेण्यासाठी त्यांना प्रतीक्षा यादीत राहावे लागत आहे.

यावेळी गडकरींनी लोकांना विनंती केली की, तुम्हीही वाहन खरेदी करत असाल तर पेट्रोल-डिझेल इंधनाची गाडी घेऊ नका. इलेक्ट्रिक किंवा फ्लेक्स इंजिन असलेली गाडी खरेदी करा.

तसेच गडकरी म्हणाले की, शेतकरी आता फक्त अन्नदाता राहिलेले नाहीत, ते ऊर्जा पुरवठादारही झाले आहेत. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी बनवलेले इथेनॉल फ्लेक्स इंजिन कारमध्ये वापरले जाऊ शकते.