पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा: ईडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ ठिकाणी छापेमारी

छत्रपती संभाजीनगर,१७ मार्च  / प्रतिनिधी :-  छत्रपती संभाजी नगर येथे पंतप्रधान आवास योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आज सकाळीच ईडीकडून शहरातील ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यानंतर ईडीने तब्बल ९ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाच लॅपटॉपवरून टेंडर भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी ईडीकडून छत्रपती संभाजीनगरातील ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्यावतीने पंतप्रधान आवास योजना राबवण्यात येत होती. या योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरांसाठी टेंडर काढण्यात आले, पण या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले होते. महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या ही बाब समोर आणली होती. याप्रकरणी तीन कंत्राटदारांसह १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता थेट ईडीचीच या प्रकरणात एन्ट्री झाल्याने खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. दरम्यान यावेळी 40 हजार घरांसाठी चार हजार कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट देण्याबाबत ही निविदा काढण्यात आली होती. यावेळी रमरथ कन्ट्रक्शन, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस या कंपन्यांनी देखील निविदा भरली होती. मात्र यावेळी भरण्यात आलेल्या निविदा एकाच आयपीवरुन भरली असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे अटींचा भंग केल्याप्रकरणी यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेची संबंधित कागदपत्रे दिल्लीच्या ईडी कार्यालयाने ताब्यात घेतली होती. 

याप्रकरणी महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या १९ मालक-भागीदारांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या योजनेसाठी टेंडर काढताना ती एकाच लॅपटॉपवरुन अर्थात एकाच आयपी अॅड्रेसवरुन निविदा भरण्यात आल्या. ही बाब प्रशासकांच्या नजरेस आल्यानंतर महापालिकेने सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्यात आली. या तक्रारीनुसार समरथ कन्स्ट्रक्शन, इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस, जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस या कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कंत्राटदार कंपन्यांनी संयुक्त भागीदारीमध्ये पुणे परिसरात बांधलेल्या बहुमजली इमारतींची पाहणी करण्यासाठी महापालिकेने समिती स्थापन केली आहे. ही समिती या कंत्राटदारांनी बांधलेल्या इमारतींची पाहणी करून अहवाल सादर करणार असल्याची माहिती मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

या प्रकरणात महापालिकेची मोठी फसवणूक झाल्याने पंतप्रधान आवास योजनेचा हा घरकूल प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.

अमर अशोक बाफना, पूजा अमर बाफना, निलेश वसंत शेंडे, अभिजीत वसंत शेंडे, योगेश रमेश शेंडे, स्वप्निल शशिकांत शेंडे, हरीश मोहनलाल माहेश्वरी, सतीश भागचंद रुणवाल (सर्वजण समरथ कन्स्ट्रक्शन अँड जेव्ही ), रितेश राजेंद्र कांकरिया, हितेश मंसुख करणावत, शामकांत जे वाणी, सुनील पी नहार, प्रवीण भट्टड (सर्वजण इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस), सुनील नहार, नितीन द्वारकादास न्याती, पियुष नितीन न्याती, प्रवीण नितीन न्याती, मनोज अर्जुन गुंजल, आनंद फुलचंद नहार (सर्वजण जगवार ग्लोबल सर्विसेस कंपनी ) अशी गुन्हा दाखल झालेल्या १९ जाणांची नावे आहेत. या सर्वांवर औरंगाबादमधील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.